मुंबई : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. यापुढे भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा देत अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील ७ जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनावर धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त केला.

बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम किंवा प्रतिबंधित दावे करणाऱ्या भ्रामक जाहिराती प्रसारित केल्या जात असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले होते. याची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २९ मे २०२६ रोजी ‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ चे उल्लंघन करणाऱ्या राज्य भरातील आस्थापनांविरुद्ध एकाच वेळी कारवाई केली. ‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चा भंग केल्याप्रकरणी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मे. दिव्या फार्मसी या उत्पादकाच्या नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजी नगर येथील आस्थापनांवर कारवाई करून तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली. यामध्ये नागपूर येथील आस्थापनामधून ७ लाख २६ हजार ७५५ रुपये, नाशिकमधून, ७ लाख १० हजार ९४५ रुपये, पुणे येथून १४ लाख ६८ हजार ९८१, मुंबईतून १ लाख ८५ हजार ६०० रुपये, कोकण विभागातून १८ लाख ५८ हजार, अमरावतीमधून १ लाख ४२ हजार २२९ रुपये, छत्रपती संभाजीनगरमधून ४८ हजार ७१८ रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच पुणे विभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये दोन ॲलोपॅथी बनावट औषधांचा तब्बल २१ लाख ८३ हजार ४२८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

नागरिकांना आवाहन व तक्रार निवारण यंत्रणा

अवैध औषध विक्री, औषधांमधील भेसळ किंवा फसव्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे. तसेच कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवता स्वतःच्या मनाने औषधांचे सेवन करू नये. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद््भवू शकतात, त्यामुळे अशा उत्पादनाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी.

तक्रार अशी करावी

औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.