मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे अन्नपदार्थांची विक्री व वितरण करणाऱ्या ब्लिंकइट, झेप्टाेच्या राज्यभरातील आस्थापनांची एफडीएकडून विशेष तपासणी करण्यात आली. या तपासणीत राज्यातील ८६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचे पालन न करणाऱ्या ६० आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून १४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एका आस्थापनेची व्यवसायिक कार्यवाही तात्पुरती थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात कोकण विभागातील सर्वाधिक १७ व मुंबईतील १४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. तर, मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

एफडीएने मुंबईतील १० ऑनलाईन फूड आस्थापनांवर केलेल्या कारवाईमध्ये ब्लिंकइट व झेप्टो प्रत्येकी तीन, राजीडी दोन, राजहाडी व भगवती स्टोअर्सचा समावेश आहे. या तपासण्यांमध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी, तापमान नियंत्रणाचा अभाव आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदींचा अभाव अशा बाबी आढळून आल्या.

एफडीएने मुंबईतील ब्लिंकइटच्या तीन आस्थापनांवर कारवाई केली. यामध्ये घाटकोपरमधील दोन तर मालाडमधील एका आस्थापनेवर कारवाई करण्यात आली. घाटकोपर पूर्वेला असलेल्या पटेल चौक येथील ब्लिंकइटच्या तपासणीदरम्यान अस्वच्छ स्टोरेज रॅक, अन्न व बिगर-अन्न पदार्थांचे योग्य वर्गीकरण नसणे, कुजलेल्या भाज्या, झुरळांचा प्रादुर्भाव, खराब छत व फरशी आढळली.

एफएसएसएआय परवान्याची प्रतही दिसेल अशी लावण्यात आली नव्हती. तसेच घाटकोपरमधीलच अन्य एका ब्लिंकइटच्या आस्थापनेमध्ये ड्रेनेज व कचरा विल्हेवाटीसाठी पुरेशा सुविधा नसणे, गोठवलेल्या अन्नपदार्थांसाठी आवश्यक तापमान न राखणे, पदार्थांची साठवणूक असलेल्या भागातील प्रकाशयंत्रणा संरक्षित नसणे आणि गोदामातील स्वच्छतेचा अभाव अशा बाबी आढळल्या. या दोन्ही आस्थापनांना आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश दिले.

मालाड पश्चिमेकडील ब्लिंकइटच्या तपासणीदरम्यान गंभीर गैर-अनुपालन आढळल्याने एफएसएसएआय परवाना निलंबित केला. शीतगृहाचे तापमान ६ अंश सेल्सिअस होते. पदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झाली नव्हती. खाद्यपदार्थांचा अव्यवस्थित साठा, भाजीपाला, मांसाहारी, शिजवलेले अन्न आणि दुग्धजन्य पदार्थांचे अपुरे वर्गीकरण तसेच एफआयएफओ/एफईएफओ पद्धतीचे पालन न होणे अशा त्रुटी आढळल्या.

झेप्टोच्या अंधेरी, मुलुंड आणि गोरेगाव येथील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अंधेरी पश्चिमेकडील झेप्टोच्या गोदामात अन्न व बिगर-अन्न पदार्थ, रसायने आणि धोकादायक पदार्थांचे योग्य वर्गीकरण नसल्याचे आढळले. तापमान संवेदनशील खाद्यपदार्थांसाठी आवश्यक तापमान नियंत्रणाची सुविधा अपुरी होती. गोठविलेल्या खाद्यपदार्थांच्या हाताळणीसाठी आवश्यक अँटीरूम सुविधा उपलब्ध नव्हती. गोदामाची रचना, कामकाजाची जागा तसेच कोल्ड व फ्रोझन स्टोरेजमधील तापमान नियंत्रण आणि नोंदी यामध्येही त्रुटी आढळल्या.

मुलुंड पश्चिमेकडील झेप्टोच्या केलेल्या तपासणीमध्ये कचरा विल्हेवाटीची अपुरी सुविधा, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील तापमान नियंत्रणात त्रुटी, प्रकाश व्यवस्था आणि स्वतंत्र साठवणूक सुविधांमध्ये कमतरता आढळली. स्वच्छतेची मानके समाधानकारक नसल्याचे आढळले. तसेच गोरेगाव पूर्वेकडील झेप्टोच्या गोला युनिटची १३ ऑगस्ट रोजी पुनर्तपासणी करण्यात आली. अन्नपदार्थांच्या तापमान नियंत्रणासाठी सुविधा अपुऱ्या असल्याचे, प्रकाश व्यवस्था व अन्नसाठवणुकीत त्रुटी असल्याचे आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता सुविधांमध्ये अपूर्णता असल्याचे आढळले.

राजीडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या वांद्रे पश्चिमेकडील आस्थापनेच्या गोदाम परिसरात धूळ, कोळ्यांची जाळी आणि अन्नकचरा आढळला. मोठ्या प्रमाणात उंदरांची विष्ठा तसेच काही खाद्यपदार्थांच्या पाकिटांजवळ कीटकांची विष्ठा आढळून आली. स्टोरेज विभाग कीटकप्रतिबंधक नसणे, एफआयएफओ/एफईएफओ पद्धतीचे पालन न होणे आणि अन्न व बिगर-अन्न पदार्थांचे योग्य वर्गीकरण नसणे अशा त्रुटी नोंदविण्यात आल्या. अंधेरी पश्चिमेकडील आस्थापनेमध्ये संवेदनशील खाद्यपदार्थांचे तापमान योग्य पद्धतीने राखले जात नसल्याचे आढळले. एफआयएफओ/एफईएफओ पद्धतीचे पालनही समाधानकारक नव्हते. तपासणीदरम्यान झोराबियन चिकन करी कट या उत्पादनाची एक्सपायरी तारीख १२ ऑगस्ट असल्याचे आढळले.

अंधेरी पूर्वेकडील राजहाडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या इन्स्टामार्ट आस्थापनेतही त्रुटी आढळल्या. मुख्य प्रवेशद्वारावर योग्य एअर कर्टन नसल्याने कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता आढळली. काही अन्नपदार्थांच्या पिशव्या थेट जमिनीवर ठेवल्या होत्या. साठवणुकीची जागा अपुरी असून अन्नपदार्थ आणि पॅकिंग साहित्याची गर्दी झाल्याचे आढळले. तापमान नियंत्रण, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबतही त्रुटी आढळल्या.

जोगेश्वरी पूर्वेकडील भगवती स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आस्थापनेच्या तपासणीत प्रकाश व्यवस्था, कामकाजाची जागा, गोदामाची रचना व स्वच्छता, कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठीच्या उपाययोजना तसेच पाणी आणि अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंटेनरबाबत काही त्रुटी आढळल्या.

पुणे, साताऱ्यातही कारवाई

कराड येथील ब्लिंकइट स्टोअरमध्ये डिलिव्हरीसाठी कार्यरत १२५ दुचाकीस्वारांकडे ओळखपत्रे नव्हती. त्यांच्या वैद्यकीय फिटनेसच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. तसेच मुख्य अन्न व्यवसाय संस्थेचा एफएसएसएआय परवाना डिलिव्हरी कार्ट, बॅग किंवा बॉक्सवर प्रदर्शित केलेला नव्हता. त्यामुळे संबंधित त्रुटींची पूर्तता होईपर्यंत दुचाकींच्या माध्यमातून डिलिव्हरीसंबंधी व्यावसायिक कार्यवाही थांबविण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यातील लोहेगाव येथे झेप्टो लिमिटेडचा परवाना गंभीर अन्न सुरक्षा व स्वच्छता उल्लंघनांमुळे निलंबित करण्यात आला.

रेफ्रिजरेटेड आणि फ्रोझन स्टोरेजमध्ये आवश्यक तापमान राखले गेले नसल्याचे, काही खाद्यपदार्थ मुदत संपल्यानंतरही साठवून ठेवल्याचे आणि एफआयएफओ/एफईएफओ पद्धतीचे पालन न झाल्याचे आढळले. वारजे जकात नाका येथील स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेडचा परवानाही निलंबित करण्यात आला. या आस्थापनेत झुरळांचा प्रादुर्भाव, फ्रोझन खाद्यपदार्थांसाठी आवश्यक कोल्ड चेनचे अपुरे व्यवस्थापन, तापमान नियंत्रणातील त्रुटी, स्वच्छता व हायजीन व्यवस्थेतील गंभीर त्रुटी तसेच कीटक नियंत्रण आणि अन्न सुरक्षा पद्धतींचे अपुरे पालन आढळले. सिंहगड रोडवरील ब्लिंकइट स्टोअरमध्येही अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या आवश्यकतांचे उल्लंघन आढळले. अन्नपदार्थांची साठवणूक व हाताळणी, स्वच्छता व सॅनिटेशन, हायजीन पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्या.