मुंबई : अन्न व औषध प्रशसानाने (एफडीए) खाद्यपदार्थांमधील भेसळविरोधात केलेली मोहीम अधिक आक्रमक करत मुलुंडमधील ‘गुप्ता चणा भंडार’ या दुकानावर कारवाई केली. यामध्ये अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक परिस्थिती आढळली. त्यामुळे दुकानातील सुखी पुरी, बारीक शेव, भाजलेला चणा, मुरमुरे, हिरवे वाटाणे जप्त करण्यात आले.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार तसेच सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी व सहाय्यक आयुक्त मेघना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी छत्रपालसिंह देवीसिंह राजपूत व अन्नसुरक्षा अधिकारी ऋषिकेश दर्शनवाड यांच्या विशेष पथकाने मुंबईमधील बेकायदेशीर आणि मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुलुंडमधील गाळा क्र. टीजी १३७, १/१ डम्पिंग रोड, गौतम नगर, मुलुंड पश्चिम येथे असलेल्या ‘गुप्ता चणा भंडार’ या दुकानाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान दुकानात अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक परिस्थिती आढळली. तसेच, दुकानांमध्ये उत्पादित व विक्रीसाठी ठेवलेल्या विविध अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादक, निर्मिती दिनांक किंवा मुदत संपल्याचा दिनांक असा कोणताही कायदेशीर लेबल असलेला मजकूर नव्हता. त्याची गंभीर दखल घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या दुकानातील ११४.२ किलो वजनाचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. जप्त केलेला माल हा ८ हजार २९० रुपये किंमतीचा आहे. सुखी पुरी, बारीक शेव, भाजलेला चणा, मुरमुरे, हिरवे वाटाणे यांचा समावेश आहे. सर्व साठा कायदेशीररित्या जप्त करण्यात आला असून, अन्नपदार्थांचे नमुने पुढील प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. विश्लेषणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यांतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे एफडीएकडून सांगण्यात आले.

सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, शुद्ध व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या निष्काळजी, अस्वच्छ आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनातर्फे भविष्यातही अत्यंत तीव्र स्वरूपाची धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

व्यवसाय बंद करण्याचे आदेश

‘गुप्ता चणा भंडार’मधील गंभीर अस्वच्छता, कीटक-प्रादुर्भावाची शक्यता आणि नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या त्रुटींची पूर्ण पूर्तता होत नाही आणि परिसर पूर्णपणे निर्जंतुक व स्वच्छ केला जात नाही, तोपर्यंत व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.