मुंबई: अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई विभागातील आठ आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. यापैकी पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले, तर तीन आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. तपासणीदरम्यान स्वच्छता, आरोग्यविषयक बाबी, अन्नपदार्थांची हाताळणी व साठवणूक तसेच अन्न दूषित होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या.
सांताक्रुझ (पूर्व) येथील ‘कॅफे सुलतान’च्या तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची सुरक्षित व स्वच्छ हाताळणी करण्यासाठी आवश्यक स्वच्छता आणि आरोग्यविषयक बाबींचे पालन होत नसल्याचे आढळले. अन्नपदार्थांची हाताळणी, तसेच परिसराच्या स्वच्छतेबाबत आवश्यक मानकांचे पालन न झाल्याने अन्न सुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी आढळल्या. त्यामुळे या आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरातील ‘लो फ्रेश फूड प्रा. लिमिटेड’च्या तपासणीत साठवणुकीच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता व आरोग्यविषयक बाबींचे पालन होत नसल्याचे आढळल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला.
अंधेरी (पश्चिम) येथील ‘कंट्री क्लब’ येथे तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची हाताळणी, परिसराची स्वच्छता, सुरक्षित साठवणूक, तसेच अन्न दूषित होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्याने परवाना निलंबित करण्यात आला. याच परिसरातील ‘सूरज लामा मोमोस’मध्ये अन्नपदार्थ तयार करणे, हाताळणे आणि साठवताना आवश्यक स्वच्छता राखली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने परवाना निलंबित करण्यात आला. सांताक्रुझ (पश्चिम) येथील कॅफे पाकिझा येथेही अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक आणि परिसराच्या स्वच्छतेबाबत आवश्यक मानकांचे पालन होत नसल्याचे तपासणीत आढळले. अन्नपदार्थांची सुरक्षितता व स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सुधारणा न झाल्याने या आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
या आस्थापनांचे परवाने रद्द
विलेपार्ले येथील एस. व्ही. रोडवरील ‘ब्लिंकिट’च्या तपासणीदरम्यान अन्न व्यवसायाशी संबंधित परवाना अटी, तसेच अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या आवश्यक तरतुदींचे पालन होत नसल्याचे आढळले. अन्न व्यवसाय सुरक्षित पद्धतीने चालविण्यासाठी आवश्यक बाबींचे पालन न केल्याने संबंधित आस्थापनेचा परवाना रद्द करण्यात आला. विलेपार्ले येथील ‘कोपेनहेगन हॉस्पिटॅलिटी’ आणि वांद्रे पश्चिम येथील ‘इटक्लब’ येथेही अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी व स्वच्छतेसाठी आवश्यक अटींचे समाधानकारक पालन होत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि अन्नपदार्थांचे दूषितीकरण टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्याने या आस्थापनाचा अन्न परवाना रद्द करण्यात आला.
