मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालिना विद्यानगरीतील गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअरमधील अक्षय कटरर्स, वांद्रे येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्हमधील क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि., दादर पश्चिम येथील मॅरियन हॉटेल अँड रेस्टॉरंट आणि चेंबूर येथील राधिका रेसिडेन्सीमधील भगवती स्टोअर्स या चार आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.
काही आस्थापनांच्या स्वयंपाकघरात तसेच अन्नसाठवणुकीच्या ठिकाणी झुरळे आणि इतर किड्यांचा सक्रिय प्रादुर्भाव आढळला. शिजवलेला भात उघड्यावर, झाकणाविना आणि जिन्याखालील अस्वच्छ जागेत ठेवण्यात आला होता. या ठिकाणी ओलसर भिंती, बुरशीची वाढ, ओलावा आणि पाण्याचे संघनन आढळून आले.
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी, उपकरणे आणि गंजलेले चाकू व अस्वच्छता असल्याचेही निदर्शनास आले. त्यावर चरबी, धुळीचे अवशेष आणि सेंद्रिय घाण साचलेली होती. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी समान तयारीची जागा, स्वयंपाकाची एकच उपकरणे वापरली जात असल्याने अन्न दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता.
आवश्यक स्वतंत्र व्यवस्था आणि स्वच्छतेच्या पद्धतींचे पालन होत नसल्याचेही आढळले. याशिवाय, काही ठिकाणी सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साचलेले होते. शेवाळ, चिकट थर आणि दुर्गंधीमुळे अत्यंत अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व गंभीर बाबींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत चारही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
