मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत वांद्रे येथील ओटर्स क्लब, दहिसर येथील डेली फ्रेश बेकर्स अँड केक्स, खार पश्चिम येथील प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंट, विलेपार्ले येथील राज ऑईल ट्रेडिंग, मरोळ येथील कॅफे सिफारिश आणि झेप्टोच्या चेंबूर येथील गोदामावर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, किडींचा प्रादुर्भाव, अयोग्य तापमान नियंत्रण, अन्न व बिगर-अन्न पदार्थांची अयोग्य साठवणूक, आवश्यक कागदपत्रांचा अभाव तसेच अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन आढळून आल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

ओटर्स क्लबचा परवाना निलंबित

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १७ ऑगस्ट रोजी वांद्रे पश्चिम येथील ओटर्स क्लबची तपासणी केली. तेथे स्वच्छता आणि आरोग्यविषयक अनेक निकषांचे उल्लंघन आढळले. तयार अन्नपदार्थांच्या विक्रीसंदर्भातील आवश्यक सूचनाफलक व अन्नपदार्थांबाबतची माहितीही योग्य प्रकारे प्रदर्शित करण्यात आलेली नव्हती. तसेच ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर बंदी असताना, त्याचा वापर करून पनीरचे विविध पदार्थ ग्राहकांना विकले जात असल्याचे आढळले. यामुळे ओटर्स क्लबचा परवाना निलंबित करण्यात आला.

डेली फ्रेश बेकर्सवर कारवाई का ?

दहिसर पूर्व येथील डेली फ्रेश बेकर्स अँड केक्सच्या तपासणीत आस्थापनात झुरळे, माशा आणि मुंग्या आढळल्या. केक तयार करण्यासाठी मुदतबाह्य खाद्य रंगाचा वापर केला जात असल्याचे तपासणीत समोर आल्याने कारवाई करण्यात आली.

खरमधील प्रिन्स ऑफ वेल्समध्ये काय झाले ?

खार पश्चिम येथील प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंटच्या तपासणीमध्ये आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याचे आढळले. किडींचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही प्रभावी नसल्याचे निदर्शनास आले. अन्न संपर्कातील उपकरणे व कंटेनर आवश्यक सुरक्षित आणि स्वच्छ स्थितीत नसल्याचे आढळले. अन्न तयार करण्यापूर्वी व नंतर उपकरणांचे योग्य निर्जंतुकीकरण होत नसल्याचे आणि शिजविलेल्या अन्नाच्या तापमान नियंत्रणातही त्रुटी असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर आस्थापनाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.

पार्ल्यातल्या राज ऑइल ट्रेडिंगवर कारवाई

विलेपार्ले पूर्व येथील राज ऑईल ट्रेडिंगच्या तपासणीत काही तेलाच्या पाकिटांवर उंदीराने कुरतडल्याच्या खुणा आढळून आल्या. साठवणूक विभागातून दुर्गंधी येत असल्याचेही निदर्शनास आले. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक तापमान व आर्द्रता नियंत्रणाचे निकषही पाळले जात नसल्याचे आढळल्याने अन्न परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मारोळमधील सिफरीशचा परवाना निलंबित

मरोळ येथील कॅफे सिफारिशच्या तपासणीमध्ये अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि वैयक्तिक वस्तूंच्या स्वतंत्र व योग्य साठवणुकीची व्यवस्था अपुरी होती. किडींचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अपुऱ्या असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

झेप्टोच्या गोदमच्या तपासणीत काय दिसले ?

चेंबूरच्या झेप्टोच्या गोदामावर कारवाई करण्यात आली. थंड आणि गोठलेल्या (फ्रोझन) अन्नाचे तापमान चुकीचे अडल्याचे दिसले. पुरेसे वायुवीजन आणि प्रकाश व्यवस्था नव्हती. भिंती व छतावरील पृष्ठभाग खराब होऊन फ्लेकिंग व स्प्लिटिंग झाले होते. फरशीवर तेल सांडल्यामुळे घसरण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. साठवणूक विभागातील अपुरी स्वच्छता व देखभालीमुळे झुरळे आणि इतर किडींच्या प्रादुर्भावास पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. तापमान नियंत्रणातील त्रुटी गंभीर असल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणी आस्थापनाला सुधारणा नोटीस देण्यात आली होती. मात्र, निर्धारित कालावधीत आवश्यक सुधारणा करून अनुपालन अहवाल सादर न केल्याने कारवाई करण्यात आली आहे.