मुंबई : मुदतबाह्य, खराब, नाकारलेले तसेच पॅकेजिंगचे नुकसान झालेले अन्नपदार्थ विल्हेवाटीच्या नावाखाली पुन्हा विक्री करण्यात येत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राबविलेल्या माेहिमेमध्ये नामांकित कंपन्यांच्या गाेदामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कोट्यवधींचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. ठाणे, नवी मुंबई व पुण्यात केलेल्या या कारवाईत सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्याबरोबरच दोन आस्थापनांबाबत परवाना निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. तसेच दोन प्रकरणांत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

भिवंडीतील वाडपे येथील नामांकीत

कंपनीच्या गोदामाच्या १४ ऑक्टोबर रोजी केलेल्या तपासणीत ३ लाख ७१ हजार ९८४ रुपये किंमतीचा सुमारे ४ हजार ६५९ किलो मुदतबाह्य माल, तसेच १ लाख १९ हजार ८६४ रुपये किंमतीचा १,४१४.१९ किलो नुकसानग्रस्त माल आढळला. याच परिसरातील अन्य कंपनीच्या कक्षात सुमारे ३०० किलो खराब आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळला. अंबरनाथमधील उसटणे येथील अन्य कंपनीत ५,४३१ उत्पादने, म्हणजेच सुमारे ९,५९० किलो वजनाचा आणि ७ लाख ८० हजार ६२० रुपये किमतीचा खराब, मुदतबाह्य व नाकारलेला साठा नोंदविण्यात आला. तपासणीत झुरळे व उंदरांचा प्रादुर्भाव, कुरतडलेली आणि गळती असलेली पाकिटे, अन्नपदार्थ आणि आयुर्वेदिक औषधे एकाच रॅकवर ठेवणे, तसेच शीतसाखळी व वाहनांच्या स्वच्छतेतील त्रुटी आढळल्या. भिवंडीतील पागाव गाव येथील एका कंपनीच्या गोदामात ३२ लाख ७१ हजार ७७४ रुपयांचा सुमारे १८ हजार ४०५ नग मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थांचा साठा आढळला.

भिवंडीतील गुलजार नगर, चाविंद्रा, वाडपे, खोणी, खाडीपार आणि काम्बा गाव, अंबरनाथमधील उसटणे तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण व निघोजे परिसरातील किरकोळ दुकाने, गोदामे आणि मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीशी संबंधित आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ५ कोटी १४ हजार ४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये तुर्भेतील एका शीतगृहात ४ कोटी १२ लाख ५३ हजार ३०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच एका दुकानातून ६ लाख ८८ हजार ४२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

विल्हेवाटीच्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी मालाची ओळख, बॅच व लॉट क्रमांक, प्रमाण, गोदामातून बाहेर पडल्याची नोंद, वाहतूक, प्राप्ती, वजन आणि अंतिम नाश अथवा कायदेशीर विल्हेवाट यांची परस्पर जुळणारी व स्वतंत्रपणे पडताळता येण्याजोगी कागदपत्रे आवश्यक असतात. मात्र, काही आस्थापनांमध्ये ही संपूर्ण कागदपत्रीय साखळी उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळले. तपासणीदरम्यान कालबाह्य आणि ग्राहकांकडून परत आलेला माल ठेवण्यासाठी स्वतंत्र, कुलूपबंद विलगीकरण कक्ष नसणे, कालबाह्य घोषित केलेल्या मालाचा आणि प्रत्यक्ष नष्ट केलेल्या मालाचा ताळमेळ नसणे, तसेच संशयास्पद विल्हेवाट प्रमाणपत्रे आढळणे अशा त्रुटी निदर्शनास आल्या.