मुंबई : राज्यात अन्न भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि अस्वच्छ अन्न व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई केली. १६ ते २० जुलैदरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ५३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत गुटखा, पान मसाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांचा सुमारे १.८५ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याचबरोबर नागरिकांना थेट तक्रार नोंदवता यावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तक्रार पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.
राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत १,७३१ लिटर दूध आणि ८९६ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. गोवंडीतील सूफी डेअरीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने १,६८३ लिटर दूध जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. लातूरमध्ये संशयित खवा, धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारातील सोयाबीन वडी, तसेच सिन्नरमधील दोन दूध व्यवसायांवरही कारवाई करण्यात आली.
प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातील मोहिमेत ३७ गुन्हे दाखल करून ४९ जणांना अटक करण्यात आली. १.८० कोटी रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला, तर २३ आस्थापना सील आणि तीन वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय इतर अन्नपदार्थांचा ५.५६ लाख रुपयांचा आणि सुमारे २,७९६ किलो साठाही जप्त करण्यात आला.
राज्यातील १०३ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करून ३४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर १६ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि इतर विभागांतील अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.
याशिवाय एफडीएने ‘फूड अँड ड्रग ग्रीव्हन्स पोर्टल’ सुरू केले असून, अन्न भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ किंवा बनावट औषधांबाबत नागरिकांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत, तसेच आवाजाच्या माध्यमातूनही ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
