मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १ जुलैपासून राबविलेल्या धडक मोहीमेमुळे राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व कॅन्टीन आस्थापनांचे धाबे दणाणले आहेत. ४ ते ६ ऑगस्ट या कालावधी एफडीएने राज्यातील १० हॉटेल आस्थापनांवर कारवाई केली. यातील ४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ५ आस्थापनांस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच एका आस्थापनेस सुधारणा नोटीस बजावली आहे.
दादर पश्चिमेकडील ईट निनो या हॉटेलच्या तपासणीमध्ये कीटकांचा वावर, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नाची आणि पिण्याच्या पाण्याची अनिवार्य चाचणी केल्याच्या नोंदी नसणे, प्रशिक्षण व वैद्यकीय नोंदी उपलब्ध नसणे इत्यादी उल्लंघन आढळले. तसेच अंधेरी पश्चिमेकडील जय मॉं काली धाब्याच्या तपासणीमध्ये खराब अवस्थेत असलेल्या प्लायवूड रॅकचा उपयोग, शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, रेफ्रिजरेटरवर तापमान दर्शवणाऱ्या डिजिटल मीटरचा अभाव, किचनच्या भिंती अस्वच्छ असल्याचे आढळले.
सांताक्रुझ पश्चिमेकडील हाऊस ऑफ महाराष्ट्र या रेस्टारंटच्या स्वयंपाकघरात झुरळांचा वावर, स्टोर रूममध्ये झुरळांचा अति प्रमाणावर प्रादुर्भाव, पॅकेजिंग साहित्य फूड ग्रेड म्हणून प्रमाणित नाही, वर्तमान पत्राचा फूड पॅकिंगसाठी वापर, स्वयंपाकाची उपकरणे गंजलेली आढळली. कुर्ला पश्चिमेकडील साऊथ इंडिया डोसा कॉर्नरमध्ये कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत आवश्यक प्रशिक्षण नाही, उपकरणे व आस्थापन अस्वच्छ असल्याचे आढळून आले. परिणामी या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले.
प्रभादेवी येथील मारूश हॉटेल, वांद्रे पश्चिमेकडील छत्रधार कॅटरर्स, शिवाजी नगर येथील विजयदीप महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आणि आयआयटी मुंबईतील दोन उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत बंधनकारक असलेला अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अन्नपूर्णा कॅटरिंग सर्व्हिसला सुधारणा नोटीस बजावण्यात आली.
तक्रार नोंदविण्यासाठी टोल-फ्री क्रमांक
अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत तक्रारीसाठी FoSCoS पोर्टल, फूड सेफ्टी कनेक्ट ॲप व टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच अन्न व औषध तक्रार पोर्टल यावरती संपर्क साधावा. नागरिकांना https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार करता येईल.
शंका येताच तक्रार करा
अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका येताच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
