मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या निकृष्ट, भेसळयुक्त व बनावट अन्नपदार्थ तसेच औषधांवर कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रयोगशाळा चाचण्यांचा वेग वाढविला आहे. जून ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या तीन महिन्यांत राज्यभरातून ३७ हजार ६०४ अन्न, औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. त्यापैकी ३२ हजार ६०४ नमुन्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली. त्यात १५ हजार २६८ नमुने अप्रमाणित दर्जाचे ठरले आहेत.
जून ते ऑगस्ट या कालावधीत तपासण्यात आलेल्या ३० हजार ४९२ अन्न नमुन्यांपैकी १५ हजार १६० नमुने अप्रमाणित ठरले. यात १५ हजार ५५ अंमलबजावणीचे नमुने व १०५ निरीक्षण नमुने यांचा समावेश आहे. याशिवाय आठ बनावट व नऊ चुकीचे लेबल असलेले नमुने आढळले. गतवर्षाच्या तुलनेत अन्न नमुने संकलन व त्यांच्या चाचण्यांच्या प्रमाणात अनुक्रमे ३४० टक्के व ४३५ टक्के वाढ झाली आहे.
औषधे व सौंदर्यप्रसाधनांच्या बाबतीतही प्रशासनाच्या तपासणीत नियमबाह्य नमुने समोर आले. तपासलेल्या २,११२ नमुन्यांपैकी १०८ नमुने अप्रमाणित आढळले. त्यात ९३ प्रमाणित दर्जाचे नसलेले, सात बनावट व सात चुकीचे लेबल असलेले नमुने असल्याची नोंद आहे. औषध नमुने संकलनात गतवर्षीच्या तुलनेत १७५ टक्के, तर त्यांच्या चाचण्यांमध्ये १६५ टक्के वाढ झाली आहे.
१७ हजार नमुने दर्जेदार
प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये एकूण १७,३३६ नमुने प्रमाणित दर्जाचे आढळले. त्यात १५ हजार ३३२ अन्न नमुने व २००४ औषधे व सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांचा समावेश आहे.
महिन्याला साडेबारा हजार नमुने
२०२५-२६ मध्ये अन्न, औषधे व सौंदर्यप्रसाधने मिळून ४७ हजार ६०० नमुने चाचणीसाठी घेतले होते. त्यापैकी ३३ हजार ११९ नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली. २०२५-२६ मध्ये दरमहा सरासरी ३,९६७ नमुने चाचणीसाठी घेतले जात होते व सरासरी २,७६० नमुन्यांची चाचणी पूर्ण होत होती. मात्र, जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत दरमहा सरासरी १२,५३४ नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्याच काळात दरमहा सरासरी १०,८६८ नमुन्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली.
मुंबई, संभाजीनगर, नागपूरमध्ये प्रयोगशाळांचे जाळे राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या तीन औषध चाचणी व तीन अन्न चाचणी प्रयोगशाळा मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे कार्यरत आहेत. याशिवाय आरोग्य विभागाच्या पुणे येथील ‘एसपीएचएल’ प्रयोगशाळेतही अन्न नमुने चाचणीसाठी पाठविले जातात. संबंधित अन्न चाचणी प्रयोगशाळांना एनएबीएल मानांकन प्राप्त आहे. निकृष्ट, बनावट, भेसळयुक्त वा नियमबाह्य उत्पादने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत असल्यास उत्पादक व वितरण व्यवस्थेतील संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. – तुकाराम मुंढे,आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
तीन महिन्यांतील आकडेवारी
तीन महिन्यांत चाचणीसाठी उपलब्ध नमुने – ३७,६०४
पूर्ण झालेल्या चाचण्या – ३२,६०४
अप्रमाणित दर्जाचे नमुने – १५,२६८
प्रमाणित दर्जाचे नमुने – १७,३३६
अन्न नमुना संकलनातील वाढ – ३४० टक्के
अन्न नमुना चाचण्यांतील वाढ – ४३५ टक्के
औषध नमुना संकलनातील वाढ – १७५ टक्के
औषध नमुना चाचण्यांतील वाढ – १६५ टक्के
