मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उत्सव आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अन्नभेसळ रोखण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी वर्षभर लागू राहणारे ‘सर्वसमावेशक स्थायी आदेश’ आणि अन्नसुरक्षा कार्यपद्धती (एसओपी) लागू केली आहे. या निर्देशांचा उद्देश उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे नसून, उत्सवादरम्यान वितरित किंवा विक्री होणारे अन्न सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत आहेत याची खातरजमा करणे हा आहे, असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशाबाबत काही गैरसमज आणि संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या आदेशाद्वारे कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. हा आदेश सर्व धर्म आणि समुदायांच्या उत्सवांना समानपणे लागू असून, विवाहसोहळे, भंडारे, ईद, नाताळ, नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारे कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आहे. आम्ही उत्सवांचे नियमन करत नाही. उत्सवांमध्ये दिले जाणारे अन्न सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करत आहोत. विवाहसोहळे, भंडारे, ईद, नाताळ, नववर्षाच्या पूर्वसंध्येचे कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांनाही हेच नियम लागू आहेत. हा कायदा २०११ पासून अस्तित्वात आहे,’ असे मुंढे यांनी सांगितले.
अन्नभेसळीविरोधात गेल्या काही महिन्यांपासून एफडीएकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्सवांच्या काळातील अन्नसुरक्षेवर पद्धतशीरपणे लक्ष ठेवण्यासाठी वर्षभराचे ‘उत्सवासंदर्भातील अंमलबजावणी दिनदर्शिका’ तयार केली आहे. यापूर्वी विविध उत्सव जवळ आल्यानंतर त्यानुसार स्वतंत्रपणे अन्नसुरक्षेच्या सूचना जारी केल्या जात होत्या. आता त्याऐवजी वर्षभरासाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीमुळे अधिकारी, अन्नविक्रेते, केटरर्स, अन्न व्यवसाय चालक आणि कार्यक्रम आयोजक यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे नियमांच्या अमलबजावणीबाबत असलेला संभ्रम कमी होऊन, कायद्याची अंमलबजावणी सातत्यपूर्ण पद्धतीने करता येईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
नियम जुनेच
अन्नसुरक्षेशी संबंधित कायदेशीर चौकट २०११ पासून अस्तित्वात आहे. अन्न व्यवसाय चालकांची नोंदणी आणि परवाना यांसह अन्नसुरक्षेशी संबंधित नियम गेल्या अनेक वर्षांपासून लागू आहेत. ही मानक कार्यपद्धती धर्मनिरपेक्ष आणि उत्सव-निरपेक्ष असून, कोणत्याही समुदाय किंवा उत्सवाशी भेदभाव केला जात नाही. भंडारे, प्रसाद किंवा सामुदायिक अन्नवाटपावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. गणपतीसह अन्य धार्मिक उत्सव, धार्मिक विधी किंवा परंपरांमध्येही हस्तक्षेप केला जाणार नाही, असे मुंढे यांनी सांगितले.
