मुंबई : सण-उत्सवाच्या कालावधीत मिठाई, खवा, पनीर, तूप, दूध, खाद्यतेल, बेसन व सुका मेवा यांसारख्या खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याचे प्रकार वाढीस लागतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वर्षभरातील सर्व सण, उत्सव, यात्रा, उरूस व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक स्थायी आदेश जारी केले आहेत. नव्या स्थायी आदेशामुळे संपूर्ण वर्षाचे नियोजन एकाच दस्तऐवजाद्वारे निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश जारी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

आजवर सणनिहाय स्वतंत्र आदेश काढून मोहिमा राबविल्याने नियोजनात विलंब, कार्यपद्धतीतील विसंगती, प्रयोगशाळांवर नमुना चाचण्यांचा वाढता ताण व विभागनिहाय अंमलबजावणीत असमानता निर्माण होत होती. त्यामुळे ‘एफडीए’ने काढलेल्या स्थायी आदेशामुळे वर्षातील विविध सण, उत्सव, यात्रा, उरूस व धार्मिक पर्वांच्या पार्श्वभूमीवर तपासणीचे नियोजन आधीच निश्चित होणार आहे.

नव्या स्थायी आदेशामुळे संपूर्ण वर्षाचे नियोजन एका छत्राखाली आणण्यात आले आहे. प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची आवश्यकता राहणार नाही. उत्पादन केंद्रांपासून घाऊक बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था, मिठाई दुकाने, खाद्यगृहे तसेच ई-कॉमर्स व तातडीने घरपोच खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या गोदामांपर्यंत प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्वामी अच्युतानंद तीर्थ प्रकरणातील निर्देशांच्या अनुषंगानेही हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे.

सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण सणांचा पहिल्या स्तर राज्यव्यापी असून, त्यामध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद-उल-फित्र व ईद-उल-अजहा तसेच ख्रिसमस व नववर्ष पूर्वसंध्या यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरा स्तर हा प्रादेशिक असून, त्यात मकर संक्रांत, महाशिवरात्र, होळी व रंगपंचमी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, आषाढी व कार्तिकी वारी, श्रावण मास, जन्माष्टमी व दहीहंडी, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, तुळशी विवाह व गुरुनानक जयंती यांचा समावेश आहे. स्थानिक स्तरावरील ग्रामदैवत यात्रा, जत्रा, उरूस, पालखी सोहळे व स्थानिक पर्वे यांचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश केला आहे.

२१ दिवस आधी कारवाई

नव्या आदेशानुसार तपासणी केवळ सणाच्या काळापुरती मर्यादित राहणार नाही. सणाच्या २१ दिवस आधीपासूनच कारवाईला सुरुवात होणार आहे. त्यानुसार कारवाई चार टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सणांपूर्वी १५ ते २१ दिवसांपूर्वी जोखीम क्षेत्रांचे नकाशांकन, गुप्तवार्ता संकलन, पथक निश्चिती, रॅपिड टेस्ट किट व अभिकर्मकांची उपलब्धता व प्रयोगशाळांना पूर्वसूचना देण्यात येणा आहे.

दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १ ते १४ दिवस अगोदर उत्पादन केंद्रे, गिरण्या, खवा मंडया, संकलन केंद्रे, शीतगृहे, गोदामे व घाऊक पेठांची तपासणी व नमुना संकलन; रात्रकालीन व पहाटेच्या वेळेतील वाहतूक तपासणी व नाकाबंदी; भरारी पथकांची कारवाई यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या टप्प्यात म्हणजे प्रत्यक्ष सणांच्या दिवशी बाजार संनियंत्रण, मिठाई दुकाने व खाद्यगृहांवर देखरेख,अन्न नमुना तपासणी व ग्राहक तक्रारींना तात्काळ प्रतिसाद या बाबींचा समावेश आहे. सणांनंतर ३० दिवसांपर्यंत विश्लेषण अहवालांचा पाठपुरावा, न्यायनिर्णयन व खटला प्रस्ताव, जप्त मालाची विल्हेवाट व सणनिहाय अहवाल या बाबींचा समावेश आहे.

सामूहिक अन्नवाटपाबाबत महाप्रसाद, इफ्तार मेजवानी, अन्नछत्र, लंगर व भंडारा अशा स्थळांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अन्न सुरक्षा कायदा व मानके यांचे पालन होते की नाही याची खात्री करावयाची आहे. अन्न शिजविणारा व पुरविणारा केटरर हा या व्यवसाय प्रकाराखाली परवानाधारक असणे कायद्याने आवश्यक असून, त्याने परिशिष्ट-क मधील नमुन्यात कार्यक्रमापूर्वी किमान सात दिवस अगोदर पदनिर्देशित अधिकाऱ्यास पूर्वसूचना द्यावयाची आहे. आयोजक मंडळे व संस्थांनी केवळ वैध परवानाधारक केटररमार्फतच अन्नवाटप करावे.

अन्न व्यवसाय चालकांसाठी वैध परवाना अथवा नोंदणी योग्य व्यवसाय प्रकाराखाली धारण करून ती ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲपच्या क्युआर कोडसह दर्शनी भागात प्रदर्शित करावी. कच्चा माल केवळ परवानाधारक अथवा नोंदणीकृत पुरवठादारांकडूनच बिलासह खरेदी करावा व अभिलेख किमान एक वर्ष जतन करावेत. परवानगी नसलेले खाद्यरंग, अखाद्य घटक व औद्योगिक रसायनांचा वापर करू नये. अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र आवश्यक.

(कोट) सण-उत्सव हा आनंदाचा व आरोग्याचा असावा. नागरिकांनी खरेदी करताना दुकानातील परवाना क्रमांक व क्युआर कोड तपासावा, पक्के देयक घ्यावे आणि भेसळीबाबत शंका आल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गंभीर उल्लंघनांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण राहील; तथापि कोणत्याही अन्न व्यावसायिकास अनुचित त्रास होणार नाही याचीही दक्षता घेण्यात येईल. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन