मुंबई : भेसळयुक्त दुधाचे वितरण थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी रात्री मुंबई आणि उपनगरातील टोल नाक्यांवर विशेष तपासणी मोहीम राबविली. मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवड या ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत तब्बल ११ हजार ८० लिटर दूध साठा जप्त करण्यात आला. निकृष्ट साठा ताब्यात घेण्यात आला असून ९० लिटर भेसळ असलेले दूध तात्काळ नष्ट करण्यात आला.

मुंबई शहर व उपनगरात दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी मंगळवारी रात्री शहराच्या टोल नाक्यांवर विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. या मोहीमेदरम्यान मुलुंड (आनंद नगर), मुलुंड (एलबीएस), ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी या ६ ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाची पथके तैनात करण्यात आली होती.

संपूर्ण रात्रभर चाललेल्या या मोहीमेत एफडीएच्या पथकांनी ११,०८०.५ लिटर दुधाचा साठा जप्त केला. त्यातील निकृष्ट साठा सील करून उत्पादकांकडे परत पाठविण्यात आला असून ९० लिटर असुरक्षित साठा तात्काळ नष्ट करण्यात आला. या कारवाईत एफडीएच्या पथकाने एकूण १९५ नमुने ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता १८८ नमुने प्रमाणित, ६ नमुने निकृष्ट व एक नमुना असुरक्षित असल्याचे आढळले.

अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनीही संशयास्पद अन्नपदार्थांबाबत विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी केले.