मुंबई : रक्तसुरक्षा, गुणवत्ता, रुग्ण व रक्तदात्यांच्या हितसंरक्षणासाठी, तसेच ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नियम, १९४५’मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व परवानाधारक रक्तपेढी व रक्तसाठवणूक केंद्रांना दिले आहेत. यामध्ये रक्तसंकलन, रक्त किंवा रक्तघटक वितरित करण्याबाबत स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करून त्याचे पालन करण्याचे निर्देश एफडीएने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

मानवी रक्त व त्याचे घटक हे ‘औषधे व प्रसाधने कायदा १९४०’अंतर्गत ‘औषध’ म्हणून अधिसूचित आहे. त्यामुळे कोणतीही रक्तपेढी किंवा संस्था वैध परवान्याशिवाय रक्त संकलन, प्रक्रिया, साठवण अथवा वितरण करू शकत नाही. तसेच प्रत्येक रक्तपेढीला ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५’मधील अनुसूची ‘एफ’ भाग १२-बीमधील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र ‘एफडीए’मार्फत राज्यातील रक्तपेढ्यांच्या केलेल्या तपासण्यांमध्ये काही केंद्रांकडून या अटींचे पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘एफडीए’ने हा आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार रक्तपेढीतील आवश्यक बाबी

अनुसूची ‘एफ’ भाग १२-बी नुसार प्रत्यके रक्तपेढीमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण विभाग व रक्तघटक प्रक्रिया सुविधा उपलब्ध असणे, नियमांनुसार पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचारिका व समुपदेशकांची नियुक्ती करणे, प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस व हिवताप या तपसाण्या करणे, रक्त व रक्तघटकांची साठवण, कोल्ड चेन राखणे व संशयित रक्तपिशव्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवणे, नियमानुसार लेबलिंग, नोंदी विहित कालावधीसाठी जतन, नियमित स्वयं-अनुपालन तपासणी करणे, रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे, आपत्कालीन सुविधा, रक्तवाहतूक व शिबिरानंतरची अहवाल प्रणाली निश्चित करणे, ई-रक्तकोश पोर्टलवर रक्तसाठा व संबंधित माहिती अद्ययावत करणे आणि सुधारित रक्तदाता निवड निकष व तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी अपात्रतेचे निकष लागू करण्याबाबत ‘एफडीए’ने २०२० मध्ये निर्देश दिले आहेत.

रक्तपेढ्यांना कार्यपद्धतीचा आढावा घेण्याचे आदेश

राज्यातील सर्व रक्तपेढींना तात्काळ त्यांच्या विद्यमान कार्यपद्धतींचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या रक्तपेढींविरोधात नियमानुसार कठोर कारवाई घेण्यात येणार आहे.

प्रत्येक रुग्णाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह रक्त व रक्तघटक मिळण्याचा हक्क आहे. या सर्वसमावेशक आदेशाद्वारे राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये एकसमान दर्जा, पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन