मुंबई : परदेशात पदव्युत्तर दंत शिक्षण (एमडीएस) किंवा पदव्युत्तर पदविका शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये सेवा देण्यासाठी एफडीएसटी परीक्षा देणे बंधनकारक असते. एनबीईएमएसने २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एफडीएसटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी होणार असून, या परीक्षेचा निकाल २१ मार्चपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.
परदेशात दंत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पुन्हा भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टरांना विदेशी दंत स्क्रीनिंग चाचणी (एफडीएसटी) परीक्षा देणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय डॉक्टरांना भारतामध्ये व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही. एनबीईएमएसकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात नुकतीच महत्त्वाची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार परदेशामध्ये दंत अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर पदविका शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये परतणाऱ्या डॉक्टरांसाठी २०२६ मधील एफडीएसटी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा केवळ नवी दिल्ली येथील परीक्षा केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेतली जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
एफडीएसटी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. पेपर १ सकाळी ९ ते ११ या वेळेत, तर पेपर २ दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान पार पडणार आहे. परीक्षेचा निकाल २१ मार्च २०२६ पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे एनबीईएमएसकडून स्पष्ट करण्यात आले. उमेदवारांना संगणकाधारित परीक्षेच्या स्वरूपाची ओळख व्हावी यासाठी एनबीईएमएसच्या संकेतस्थळावर सराव परीक्षेची सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेपूर्वी सराव करण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही एनबीईएमएसकडून करण्यात आले आहे.
एनबीईएमएसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि अन्य तपशील अधिकृत संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेत उपलब्ध करण्यात आले आहेत. ही माहिती पुस्तिका १७ फेब्रुवारी २०२६ पासून एनबीईएमएसच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेसंदर्भातील कोणत्याही शंका किंवा माहितीसाठी उमेदवारांनी एनबीईएमएसच्या कम्युनिकेशन वेब पोर्टलद्वारे संपर्क साधावा. तसेच विदेशातून एमडीएस किंवा पदव्युत्तर डिप्लोमा शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी वेळापत्रक लक्षात घेऊन आवश्यक तयारी करावी, असे आवाहनही एनबीईएमएसतर्फे करण्यात आले आहे.

