मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील ठाण्याच्या दिशेकडील अवजड वाहतूक बंद

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर गुरुवारी पहाटे पडलेल्या खड्ड्यामुळे या मार्गावरील नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला. मात्र, हलक्या वाहनांना मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ये-जा करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले असले तरी नवी मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडीचे संकेत आहेत.

उरण जेएनपीटीहून गुजरात, भिवंडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून होते. याच मार्गावरून हलकी वाहनेही ठाण्याहून महापे, कल्याणच्या दिशेने ये-जा करत असतात. गुरुवारी ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील रेतीबंदर पुलावर खड्डा पडला. हा खड्डा इतका मोठा आहे की, पुलाखालून जाणारा रस्ताही दिसत होता. यामुळे या मार्गावरील नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. ३१ जुलैपर्यंत हा वाहतूक बदल असेल.

दरम्यान, बाह्यवळण मार्गावरील खड्ड्यांबाबत सर्वसामान्य वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडतात. जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते, असे शिळफाटा येथील रहिवासी मंगल खारपाटील सांगितले.

वाहतूक बदल असा…

’ठाणे शहरात दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत अवजड वाहनांना परवानगी आहे.

’वाहतूक बदल झाल्याने उरण जेएनपीटीहून गुजरात, भिवंडी, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहतुकीस शिळफाटा येथे प्रवेशबंदी असेल.

’येथील अवजड वाहने महापेमार्गे कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली, आनंदनगर, कोपरी पूल येथून ठाणे शहरात येतील. या मार्गावर वाहतुकीचा भार वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.