देशभरात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठय़वेतनात वाढ व्हावी, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या लढा यावर्षी आक्रमक झाला असून, भावी वैज्ञानिकांनी २८ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा देशातील विज्ञान संस्थांपासून अनेक तंत्रज्ञान संस्थांमध्ये विज्ञान दिन या संशोधकांशिवाय साजरा होण्यावर प्रश्नचिन्ह आहेत.

देशातील विविध विज्ञान संस्था, आयआयटी, विद्यापीठे या ठिकाणी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरमाह पाठय़वेतन लागू करण्यात येते. या पाठय़वेतनामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाच्या अभ्यासासाठी आवश्यक ते खर्च करणे अपेक्षित असते. या पाठय़वेतनाची रक्कम २०१०पासून वाढली नसल्याने देशभरातील संशोधक रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनात देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पीएच.डी. करणारे विद्यार्थी सहभागी झाले असून, त्या-त्या संस्थांमध्ये आंदोलनेही सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा वापर करून आंदोलन सुरू केले आहे. यात फेसबुकवर पान सुरू करण्यात आले असून तेथे ३३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच ट्विटरवरही देशाच्या व्यवस्थेचा निषेध व्यक्त करत २८ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या विज्ञान दिनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमध्ये २७ फेब्रुवारी रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. याचबरोबर ‘मर गया विज्ञान’ या विषयावर पथनाटय़ही सादर केले जाणार आहे. तर २ मार्च रोजी रजेचा अर्ज देऊन विद्यार्थी प्रयोगशाळांमध्ये दांडी मारणार आहेत. दिल्ली, बेंगळुरू येथेही आंदोलन जोरात सुरू असून दिल्लीतील आंदोलकांनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन या मागणीबद्दल चर्चा केली असता याबाबत विचार करू एवढेच आश्वासन मिळाले. पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.