दादागिरीला कंटाळून अल्पवयीन मुलाने केली गुंडाची हत्या

धारावीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाला सय्यद सर्वांसमक्ष चिडवायचा. त्याच्यावर शेरेबाजी करायचा. तसेच त्याला त्रासही द्यायचा. हा प्रकार असह्य झाल्याने त्या मुलाने सय्यदची हत्या करण्याचे ठरवले.

(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबईतील धारावीत १७ वर्षांच्या मुलाने सराईत गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना घडली. रियास बासू सय्यद असे या मृत्यू झालेल्या गुंडाचे नाव असून हत्या केल्यानंतर मुलगा स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला.

धारावीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाला सय्यद सर्वांसमक्ष चिडवायचा. त्याच्यावर शेरेबाजी करायचा. तसेच त्याला त्रासही द्यायचा. हा प्रकार असह्य झाल्याने त्या मुलाने सय्यदची हत्या करण्याचे ठरवले.

शनिवारी सय्यद अभ्युदय बँक रोडजवळ थांबला होता. यादरम्यान मुलाने त्याला गाठले. सय्यदने चारचौघात केलेल्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता. त्याने चाकूने सय्यदला तब्बल १४ वेळा भोसकले.

सय्यदवर हल्ला केल्यानंतर तो मुलगा थेट पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने सय्यदची हत्या केल्याची कबुली दिली. सुरुवातीला रक्ताने माखलेल्या मुलाला बघून त्यालाच मारहाण झाली असावी असे आम्हाला वाटले. पण त्याने हत्या केल्याचे ऐकून आम्हालाही धक्का बसला, असे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुलाने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शीव रुग्णालयात विचारणा केली. तिथे सय्यदचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांनी त्या मुलाला अटक केली. सध्या त्याची रवानगी बाळ सुधार गृहात करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fed up with bullying minor kills 22 year old in dharavi

ताज्या बातम्या