म्हातारपण हे दुसरे बालपण असते असे म्हणतात. १९२६ साली स्पेनच्या बार्सिलोना येथे जन्मलेले, पण गेली ६० वर्षे आपल्या समाजकार्याने, अभ्यासाने भारत हीच आपली कर्मभूमी मानणारे ख्रिश्चन धर्मगुरू फेडरिको सोपेना गुसी यांना वयाच्या नव्वदीतही अशाच एका बालहट्टाने घेरले- ‘भारतीय’ होण्याच्या हट्टाने. अखेर गेली चार-पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सोपेना यांचा हा हट्ट पूर्ण झाला. २१ एप्रिल २०१६ला हा ९० वर्षांचा वृद्ध गृहस्थ ‘भारतीय’ म्हणून पुन्हा एकदा जन्मला!
१९४९ साली भारतात आलेले सोपेना जन्माने ख्रिश्चन आहेत. गेली अनेक वर्षे रायगडमधील कातकरी आदिवासींकरिता ते काम करीत आहेत. इथल्या स्थलांतरित आदिवासींकरिता काम करणारे सोपेना वाडीवस्तीवर ‘सोपेना बाबा’ म्हणून ओळखले जातात. हिंदी, मराठी या भारतीय भाषाच नव्हे तर भारतीयांचे जगणेही आत्मसात केलेल्या गृहस्थाने इथल्या परंपरांवरही प्रेम केले. म्हणूनच धर्मनिरपेक्षतेवर दृढ विश्वास असूनही ते ‘चारधाम’ही करून आले आहेत. ‘भारतमाता की जय’ ते इतक्या सहजपणे बोलतात की, त्यात कुठलाही अभिनिवेश नसतो आणि गुरुवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तर सोपेना यांच्या दृष्टीने या घोषणेला नवेच परिमाण मिळाले होते.
पांढरा झब्बा-कुर्ता हाच पेहराव असलेले सोपेना यांना उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्नो यांच्यासमोर भारतीयत्वाची शपथ देण्यात आली आणि गेली अनेक वर्षे उराशी बाळगून असलेले स्वप्न पूर्ण झाले. शपथविधीनंतर मिळालेले भारतीयत्वाचे प्रमाणपत्र दाखविताना त्यांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याची भावना होती.
तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भाषा आणि धर्माचा अभ्यास असलेल्या सोपेना यांनी ३८ वर्षांपूर्वीही भारतीयत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सातत्याने २०११ पर्यंत त्यांनी तीन वेळा हा अर्ज केला; परंतु प्रत्येक वेळेस त्यांचा अर्ज नागरिकत्व मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळखाऊ व किचकट प्रक्रियेत अडकत राहिला. अखेर २०११ साली त्यांनी निर्धार केला. मधल्या काळात हृदयात पेसमेकर बसविण्यात आल्याने प्रकृतीच्या कुरबुरी वाढल्या. आधीच १९८९ साली रायगडमध्ये झालेल्या अपघातात त्यांना डावा पाय गमवावा लागला. वाडय़ावस्त्यांमधील भटकंतीची मदार होती ती कृत्रिम पायावर. अशाही स्थितीत ‘मी स्पॅनिश म्हणून जन्मलो असलो तरी मरणार मात्र भारतीय म्हणूनच,’ या विचाराने सोपेना यांना पछाडले. याच भागात आदिवासींकरिता काम करणाऱ्या वैशाली पाटील यांच्याशी त्यांचा परिचय आला आणि सोपेना यांना ‘भारतीय’ बनण्यासाठीचा मार्ग सोपा झाला. वैशाली पाटील यांनी सोपेना यांची विखुरलेली, आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे पुन्हा एकदा जमा केली. रायगडचे विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आणि वैशाली पाटील यांनी दिल्लीतील नागरिकत्व संचालनालयापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर सोपेना यांना भारताचे विशेष नागरिकत्व बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्याला आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची संधी मिळते त्याच्याइतका सुखी कुणीच नाही. भारत ही माझी कर्मभूमी असली तरी आता तीच माझी मातृभूमीही आहे. तिच्या मातीत मला अखेरचा श्वास घ्यायला मिळणार आहे, याचा मला आनंद आहे
– फेड२िको सोपेना, समाजसेवक

दुष्काळ हे दुर्दैव
महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थितीवर भाष्य करताना सोपाने म्हणाले की, येथे वर्षभर पुरेल इतका पाऊस पडतो, त्यामुळे ही समस्या खरे तर या राज्यात उद्भवायलाच नको; परंतु पाणीवाटपात असलेल्या असमानतेमुळे दुष्काळजन्य परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवते हे दुर्दैव आहे.