मुंबई : राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शुल्कनिश्चितीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाने आणखी एक संधी दिली आहे. या प्रस्तावांसाठी ऑनलाइन लिंक खुली करण्यात आली असून, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मुदतीत प्रस्ताव सादर न केलेल्या संस्थांना प्रति अभ्यासक्रम एक लाख रुपये दंड भरावा आकारण्यात येणार आहे.

विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी अद्याप शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव सादर केलेला नाही, त्यांना निर्धारित दंडाच्या अधीन राहून प्रस्ताव सादर करण्याची आणखी एक संधी देण्याचा निर्णय शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भात एफआरएला पत्र लिहिले होते. त्याचप्रमाण ज्या संस्थांना निर्धारित शुल्कामध्ये कोणतीही वाढ करायची नाही, परंतु त्यांनी शुल्कवाढ न करण्याचा पर्याय म्हणजेच नो अपवर्ड रिव्हिजन ऑफ फी हा पर्याय निवडला नाही, अशा संस्थांनाही प्रस्ताव सादर करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र या संधीसाठी प्रति अभ्यासक्रम पाच हजार रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात आले आहे.

शुल्कवाढीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थांसाठी निर्धारित दंडाची रक्कम भरणे, तर शुल्कवाढ न करण्याचा पर्याय निवडणाऱ्या संबंधित संस्थांसाठी पाच हजार रुपये प्रक्रिया शुल्क भरणे ही प्रस्ताव स्वीकारण्याची पूर्वअट असेल. त्यामुळे केवळ ऑनलाइन अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण होणार नाही; लागू असलेले शुल्क भरणेही आवश्यक राहणार आहे. शुल्कनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संस्थांना १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन प्रस्ताव सादर करावा लागेल.

निर्धारित कालावधीत ऑनलाइन प्रस्ताव सादर न करणाऱ्या संस्थांना शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव सादर करण्यात स्वारस्य नसल्याचे गृहीत धरण्यात येईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी निर्धारित मुदतीचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. या निर्णयामुळे निर्धारित वेळेत शुल्कनिश्चितीचे प्रस्ताव सादर न केलेल्या संस्थांना प्रक्रिया पूर्ण करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, त्यासाठी लागू असलेला दंड किंवा प्रक्रिया शुल्क भरणे आणि ऑनलाइन प्रस्तावासह आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत

ऑनलाइन प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची प्रत आणि संबंधित आवश्यक कागदपत्रे प्रस्ताव सादर केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत शुल्क नियामक प्राधिकरणाकडे जमा करावी लागतील. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्रे जमा करण्यासाठी स्वतंत्रपणे १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.