मुंबई विद्यापीठाचा निर्णय

मुंबई : करोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी शंभर टक्के शुल्कमाफी देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला असून इतर अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनाही शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.

करोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला. अशा विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षण घेण्यात अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.  त्यामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे ठरवले आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी ही सवलत  देण्यात आली आहे.

तसेच करोनाकाळातील आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी इतर अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनाही शुल्कात काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची अडचण आणि त्यामागची पाश्र्वाभूमी समजून घेतली जाईल. या विद्यार्थ्यांना अभ्यास दौरा, विद्यार्थी कल्याण, विकास निधी आणि इतर काही विभागांसाठी आकारण्यात येणारे शुल्क १०० टक्के माफ केले असून ग्रंथालय, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, अभ्यासेतर उपक्रम यांच्या शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.