मुंबई: टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे जो सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु त्याचा शरीराच्या इतर भागांवर, जसे की मेंदू, आतडे, हाडे आणि प्रजनन अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय, तज्ज्ञांच्या मते, जननेंद्रियाचा टीबी हे वंध्यत्वाचे एक सामान्य कारण असू शकते, विशेषतः महिलांमध्ये. भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याने, भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच निदान आणि उपचारांच्या करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की टीबीचे जीवाणू फुफ्फुसातून रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात. जेव्हा त्याचा प्रजनन अवयवांवर परिणाम होतो, तेव्हा त्याला जननेंद्रियाचा टीबी असे म्हणतात. याची लक्षणे अनेकदा दिसून येत नाहीत. त्यामुळे प्रजनन क्षमतेशी संबंधित समस्यांसाठी प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

टीबी हा ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’ नावाच्या जिवाणूंमुळे होतो, जो संक्रमित व्यक्ती खोकल्यास किंवा शिंकल्यास हवेतून पसरतो. टीबीचा परिणाम हा आपल्या फुफ्फुसांवर होतो, तर फुफ्फुसेतर टीबीचा परिणाम शरीराच्या इतर भागांवर, जसे की लसिका ग्रंथी, हाडं, मेंदू, आतडे आणि प्रजनन अवयवांवर होऊ शकतो. टीबीच्या सामान्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ आढळणारा खोकला, ताप, रात्रीच्या वेळी घाम येणे, थकवा आणि वजन कमी होणे यांचा समावेश होतो.

जननेंद्रियाच्या टीबीमध्ये अनेकदा सौम्य लक्षणे दिसून येतात किंवा कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत, त्यामुळे त्याचे निदान करणे कठीण होते.वाशीतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीचे वंध्यत्व निवारण डॉ. अवंतिका वझे सांगतात की, वेळीच निदान न झाल्यास जननेंद्रियाच्या टीबीचा प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो. महिलांमध्ये, यामुळे फॅलोपियन ट्यूब्स, गर्भाशय आणि त्याच्या अस्तराला नुकसान पोहोचते, ज्यामुळे ट्यूब्समध्ये अडथळा, अनियमित मासिक पाळी, रक्तस्त्राव कमी होणे आणि गर्भघारणेत अडचण येणे अशा समस्या दिसून येतात.

पुरुषांमध्ये, याचा परिणाम वृषण, एपिडिडायमिस किंवा प्रोस्टेटवर होऊ शकतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होणे, शुक्राणूंच्या मार्गात अडथळा येणे किंवा शुक्राणूंची गुणवत्ता खराब होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. लक्षणे स्पष्ट दिसत नसल्यामुळे, अनेक रुग्णांना वंध्यत्वावरील उपचारांसाठी गेल्यावरच याविषयी माहिती मिळते. डॉ. अवंतिका वझे पुढे सांगतात की, जर टीबीचे निदान लवकर झाले, तर त्यावर उपचार शक्य आहेत. टीबीविरोधी औषधे संसर्ग नाहीसा करू शकतात आणि प्रजनन अवयवांचे नुकसान टाळू शकतात.

ज्या प्रकरणांमध्ये प्रजननक्षमतेवर परिणाम झाला आहे, तिथे आयव्हीएफ किंवा आयसीएसआय सारख्या तंत्रांद्वारे गर्भधारणा शक्य आहे. जागरूकता, वेळीच निदान आणि योग्य उपचार अत्यंत गरजेचे असल्याचे ठाणे जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ श्रेया शेळके यांनी सांगितले.टीबीमुळे महिलांच्या फॅलोपियन ट्यूबला (गर्भाशयाच्या नलिकेला) इजा होऊ शकते, ज्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि गर्भाशयाच्या अस्तरावरही याचा परिणाम होतो, ज्यामुळे गर्भधारणा कठीण होते.

याशिवाय, पुरुषांमध्ये, याचा परिणाम वृषण किंवा एपिडिडायमिसवर होऊ शकतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते किंवा प्लासेंटामध्ये अडथळा निर्माण होतो. या समस्यांचा मानसिक परिणामही होऊ शकतो, विशेषतः जेव्हा मूळ कारण अज्ञात असते. सुदैवाने, वेळीच निदान आणि योग्य उपचाराने, या समस्या मोठ्या प्रमाणात बऱ्या होऊ शकतात, ज्यामुळे जोडप्यांना पालकत्वाची संधी मिळते असे वरिष्ठ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रीटा मोदी म्हणाल्या,

स्त्रीरोगतज्ञ डॉ. केकिन गाला म्हणाल्या की, क्षयरोग (टीबी) हा केवळ फुफ्फुसांचा आजार नाही. वेळीच निदान व उपचार न केल्यास, त्याचा महिलांच्या प्रजनन आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. जननेंद्रियाचा टीबी अनेकदा सुरुवातीच्या काळात निदान न होता राहतो, परंतु तो वंध्यत्वाचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकतो, विशेषतः ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी, पोटाच्या खालच्या भागात सतत वेदना किंवा गर्भधारणेस अडचण येते

त्यांच्यामध्ये या संसर्गामुळे फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय आणि आसपासच्या अवयवांना नुकसान पोहोचू शकते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे कठीण होते. अनेक महिला अनियमित मासिक पाळी, पोटाच्या खालच्या भागात वेदना, अशक्तपणा किंवा अचानक वजन कमी होणे यांसारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ही लक्षणे सुरुवातील किरकोळ वाटू शकतात, परंतु त्वरित उपचार न केल्यास भविष्यात ते गंभीर रुप धारण करु शकतात.

टीबीचे वेळीच निदान आणि योग्य उपचाराने भविष्यतील गुंतागुंत टाळता येते. याबाबत जनजागृती करणे आणि वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना वंध्यत्वाची समस्या किंवा कोणतीही असामान्य लक्षणे जाणवल्यास त्यांनी तज्ज्ञांची भेट घेण्यास विलंब करू नये. वेळीच निदान, योग्य उपचार आणि नियमित पाठपुरावा यामुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढते.

तज्ञांच्या मते, ज्या व्यक्तींना क्षयरोगाचा वैद्यकिय इतिहास आहे, ज्यांना ओटीपोटात सतत वेदना होतात, ज्यांचे वंध्यत्वाचे कारण स्पष्ट नाही किंवा ज्यांना प्रजननक्षमतेशी संबंधित इतर कोणतीही समस्या आहे, त्यांनी त्वरित वैद्यकिय सल्ला घ्यावा. वेळीच निदान आणि उपचारांमुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.