शेतकऱ्यांवर खतभार; खतांच्या किमतीत ५० ते १९५ रुपयांनी वाढ; दर पूर्ववत करण्याची मागणी

 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पेरणी केलेले गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांसाठी जानेवारीत खतांची मागणी वाढली आहे.

खतांच्या किमतीत ५० ते १९५ रुपयांनी वाढ; दर पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई : रब्बी हंगामासाठी खतांची मागणी वाढलेली असताना खतांच्या किमतीत प्रत्येक पिशवीसाठी ५० ते १९५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सारे गणित बिघडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे केली आहे.

 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पेरणी केलेले गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांसाठी जानेवारीत खतांची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये पिके काढणीस येण्यापूर्वी चांगल्या उत्पादनासाठी जानेवारीदरम्यान शेतकरी खतांचा वापर करतात़.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खत उत्पादकांनी रब्बीसाठी खतांच्या किमती जाहीर केल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक खतांच्या किमतीत वाढ झाली. १०:२६:२६ या खताची पिशवी १४७० रुपयांना मिळत होती ती १७० रुपयांनी महाग होऊन १६४० रुपयांना मिळत आहे. तर १२:३२:१६ या खताची १४९० रुपयांची पिशवी १६४० रुपयांना मिळत असून, १५० रुपयांनी महाग झाली. १६:२०:०:१३ या खताच्या किमतीत ५० रुपये वाढ झाली. अमोनियम सल्फेटची ८७५ रुपयांची पिशवी १२५ रुपयांनी महाग होऊन १ हजार रुपयांना मिळत आहे. १५:१५:१५:०९ या खताच्या किमतीत १९५ रुपयांची वाढ झाली.

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आधीच्या किमती व आता वाढलेल्या किमतींची आकडेवारी मांडत केंद्रीय खते व रसायनमंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहिले आहे. रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात. खत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. त्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे दादा भुसे यांनी या पत्रात म्हटले आहे.

ऐन हंगामात शेवटच्या टप्प्यात उत्पादन वाढण्यासाठी पिकांना खतांची गरज असताना खतांच्या किमती वाढल्याने आर्थिक भार पडत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक आदेश द्यावेत. 

                            – दादाजी भुसे, कृषिमंत्री

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fertilizer price hike by rs 50 to rs 195 request to undo the rate fertilizer burden on farmers akp

Next Story
मुंबै बँकेवर प्रशासक नियुक्तीसाठी याचिका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी