सण हे खरे तर आनंदासाठी साजरे केले जातात. निसर्गाशी समरस होत आपल्या पूर्वजांनी या सणांची संकल्पना पुढे आणली. मात्र श्रावणापासून सण सुरू होतात तेव्हा सणांपेक्षा जास्त त्यातील उपद्रवी घटकांचीच चर्चा जास्त होते. हवा, पाणी, आवाज याबाबत आपण एवढे उदासीन आहोत का?

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

पूर्वी सण येणार असल्याची चाहूल आजुबाजूच्या परिसरातील तयारीने लागायची. हल्ली मात्र न्यायालयातील प्रकरणांवरून सणांचा गाजावाजा अधिक होतो. सध्या दहीहंडी आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांच्या निमित्ताने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहेत. सण हे खरे तर आनंदासाठी साजरे केले जातात. निसर्गाशी समरस होत आपल्या पूर्वजांनी ही सणांची संकल्पना पुढे आणली. पण आताशा सण म्हणजे क्षणाचा आनंद व अनंतकाळचा ताण अशी अवस्था का होत आहे?

सण म्हणजे आनंद. हा आनंद शरीराच्या पंचेद्रियांनी अनुभवायला हवा, अशी त्याची रचना आहे. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा या सर्व इंद्रियांना सुखावणारे घटक सणामध्ये असतात. सुगंधी उटण्याने आंघोळ, दिवे-पणत्या, सजावट, धूप-उदबत्तीचा गंध, संगीत, नवेद्य असे एकाच वेळी एकापेक्षा अधिक इंद्रियांना सुखावणारे घटक आपल्या सणांचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातील ताण कमी करण्यासाठी सणांचा उपयोग होतो. मात्र एखाद्या गोष्टीतून आनंद झाला की ती पुन:पुन्हा अधिक मोठय़ा प्रमाणात करण्याची बळावते. जे जे चांगले वाटते ते अधिक प्रमाणात व्यक्त होण्याकडे कल वाढतो. हेच सणांमध्ये व्हायला लागले आणि पुढे पुढे तर विशिष्ट अतिरेकी आनंदासाठीही तो तो सण ओळखला जाऊ लागला. या बदलणाऱ्या सणांमुळे संस्कृतीवर कसे व कोणते परिणाम होतील, ते वेगळे. मात्र आपल्या सणांमुळे गेल्या काही वर्षांत पुढे आलेल्या समस्यांची यादी पाहिली तरी निसर्गातील बदलांचे स्वागत करण्यासाठी, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झालेले सण निसर्गाची व निसर्गाचा भाग असलेल्या माणसांची किती हानी करताहेत हे वेगळे सांगावे लागणार नाही. सणांसंदर्भात गेल्या काही वर्षांत उठवले गेलेले आक्षेप व त्याची सद्य:स्थिती अशी आहे.

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. पूजेच्या नावाखाली पकडून आणलेल्या नागांना जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रकार बिनदिक्कत अनेक वर्षे सुरू होता. टोपलीतले अर्धमेले नाग पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होत असते. कायदेशीर बंदी आल्यानंतर ही प्रथा मागे पडली आहे.

दहीहंडी हा सण तर गेल्या काही वर्षांत थर आणि गोंगाटासाठीच प्रसिद्ध झाला आहे. सकाळी साजरा करण्याची परंपरा असलेला हा सण आता रात्री रंगात येतो. दिवसभर डीजेच्या घणघणाटामुळे अख्ख्या मुंबई-ठाण्याच्या आवाजाची पातळी १०० डेसिबल ओलांडून गेलेली असते. सर्वसाधारण निवासी भागात दिवसा ५५ डेसिबलची आवाजाची मर्यादा आहे. याबाबत तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने ध्वनीमर्यादेच्या कायद्याची आठवण करून दिली. मात्र तरीही बिनदिक्कतपणे कायदा धाब्यावर बसवला जात असल्याचे गेल्या वर्षीही दिसले.

गणेशोत्सवाच्या वेळी रस्त्यावर येत असलेल्या मंडपाबाबत न्यायालयाने भूमिका घेतली असली तरी सजावटीत थर्मोकोल-प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, मूर्तिविसर्जनामुळे होत असलेले पाणीप्रदूषण, मिरवणुकांमधील डीजेचा आवाज यामुळे हवा, पाणी व आवाज यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाही. कृत्रिम तलावांच्या प्रयोगातही प्रदूषण नियंत्रणाचा अर्धा टप्पाच गाठला गेला आहे. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाला बंदी असल्याचा मात्र चांगला परिणाम दिसतो.

नवरात्रोत्सवातील रासगरबाऐवजी दांडिया रासचा आवाज नऊ दिवस चालत असतो. ध्वनिप्रदूषणाच्या नियमाचा बडगा उगारल्यावर आता बंद स्टेडियममध्ये दांडिया होतो आणि रात्री दहाची मर्यादा दोन दिवस शिथिल केली जाते. काही ठिकाणी पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी होत नसली तरी आधीच्या तुलनेत ही स्थिती बरी म्हणावी लागेल.

दिवाळीतील फटाक्यांमुळे होणारा आवाज व ध्वनिप्रदूषणाबाबत फारशी कायदेशीर कारवाई झालेली नाही. मात्र मुंबईत गेल्या काही वर्षांत आवाजी फटाक्यांची जागा नेत्रदीपक फटाक्यांनी घेतली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी झालेले नसले तरी आवाज काही प्रमाणात कमी झाला आहे. दिवाळीतील प्रकाश प्रदूषणाबाबत मात्र अजूनही आपल्याकडे म्हणावी तशी चर्चा घडलेली नाही. मात्र येत्या काळात हा मुद्दा केंद्रस्थानी येऊ शकेल.

संक्रातीला मांजामुळे अनेक पक्षी जखमी आणि मृत होतात. दरवर्षी या पक्ष्यांची संख्या जाहीर होत असली तरी त्याबाबत कोणी न्यायालयात गेलेले नाही. होळीसाठी झाडे तोडायला बंदीचा परिणामही चांगला दिसून येतो.

आम्ही आता सणच साजरे करू नयेत का, हा प्रश्न गरलागू आहे. आपल्या आनंदाच्या कल्पना नेमक्या काय आहेत, ते तपासून घ्यायला हवे. गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलावाची मोहीम सुरू करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितले की, अनेक वष्रे जागृती करूनही शाडूच्या मूर्तीची संख्या वाढत नाही. कारण शाडूची माती व नसर्गिक रंगाने तयार करण्यात आलेली मूर्ती चकचकीत दिसत नाही. मुलांच्या आग्रहाखातर वाढदिवसाप्रमाणेच एक इव्हेंट म्हणून गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांकडून अधिक अपेक्षाही ठेवता येत नाही. दैनंदिन जीवनच अधिकाधिक चकचकीत, झगझगीत होत असताना गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, हे समाजाच्या पचनी कसे पडणार?

सणातून आनंद घेण्याचा जसा आपल्याला अधिकार आहे तसा आपल्या आनंदामुळे इतर कोणाच्या तरी आनंदावर विरजण पडू देऊ नये, याची काळजी घेण्याचे कर्तव्यही आपलेच आहे. निसर्ग तेच शिकवतो.

prajakta.kasale@expressindia.com