मुंबई : अकरावी प्रवेशाच्या शून्य फेरीसाठी प्रवेश अर्ज भरताना पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक कारणांमुळे प्रवेश प्रक्रियेत खोडा निर्माण झाला. संकेतस्थळ सुरू न झाल्याने विद्यार्थी व पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. साडेअकराच्या सुमारास संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले.

अकरावी प्रवेश परीक्षेच्या शून्य फेरीसाठी सोमवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्ज भरण्यास बुधवारपर्यंत ( १३ मे ) मुदत देण्यात आली आहे. मात्र सोमवारी सकाळी अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी संकेतस्थळ सुरू होत नव्हते, तर कधी प्रक्रिया पुढेच सरकत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. अखेर साडेअकराच्या सुमारास संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

हमीपत्र घेऊन अर्ज

राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल ८ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि शाळा सोडण्याचा दाखला अद्याप मिळाला नाही. मात्र इयत्ता अकरावीचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई व आयसीएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्याने त्यांच्याकडेही शाळा सोडल्याचा दाखला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हमीपत्र भरून ऑनलाईन अर्ज भरावे लागत आहे.

शून्य फेरीपासून राहणार वंचित

आयजीसीएससी व आयबी मंडळाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसून हे निकाल १९ मे रोजी म्हणजेच शून्य फेरी जाहीर होण्याच्या दिवशी लागणार आहेत. त्यामुळे या मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या शून्य फेरीपासून वंचित राहावे लागणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांसमोर आव्हान

शून्य फेरी जाहीर होईपर्यंत राज्य मंडळासह सीबीएससी, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही, तर त्यांना प्रवेश घेणे अवघड होणार आहे. कारण शाळा सोडल्याचा दाखला व मूळ गुणपत्रिका ही प्रवेशवेळी कनिष्ठ महाविद्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना १९ मेपर्यंत दाखला आणि गुणपत्रिका न मिळाल्यास कनिष्ठ महाविद्यालयांसमोर प्रवेशासाठी संकट उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.