police recruitment 2024 मुंबई : राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी ३९२४ पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.
राज्य पोलीस दलातील १७ हजार ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १६ लाख ८८ हजार ७८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील पोलीस शिपाई व चालकांच्या एकूण पदांपैकी ३० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. राज्यभरात एकूण ३९२४ पदे महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. या पदांसाठी दोन लाख ७८ हजार ८२९ महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजे प्रत्येक पदासाठी किमान ७१ महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. राज्यात सर्वाधिक पसंती मुंबई विभागाला आहे. मुंबईत १२५७ पदांसाठी मैदानी परीक्षा सुरू आहे. त्यासाठी सुमारे एक लाख १० हजार महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दोन – तीन ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यात अनेकांनी मुंबईला पहिली पसंती दिल्यामुळे तुलनेने येथे अधिक अर्ज आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>>पेंग्विनच्या देखभालीचा खर्च वाढला, देखभाल खर्चासाठी २० कोटींची निविदा
पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यातील ६६ केंद्रांपैकी २२ केंद्रांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. मिरा – भाईंदर, छत्रपती संभाजी नगर शहर, नवी मुंबई, सोलापूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, मुंबई लोहमार्ग, पालघर, सांगली, नाशिक ग्रामीण, अहमद नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बीड, जालना, यवतमाळ, लातूर, वाशीम, भंडारा, वर्धा व पुणे लोहमार्ग या २२ पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांचा समावेश आहे. पावसामुळे मुंबईमध्ये वेळेवर मैदान उपलब्ध न झाल्यामुळे अद्याप मैदानी परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ती सध्या तीन ठिकाणी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
●एकूण १६,८८,७८५ अर्जांपैकी २,७८,८२९ महिला अर्जदार आहेत.
●पोलीस शिपाई : रिक्त पदे ९५९५ एकूण अर्ज ७,८२,७९६, महिला अर्जदार १,७१,७६१
●चालक : रिक्त पदे १६८६ एकूण अर्ज १,८३,०७०, महिला अर्जदार १५,६०९
●कारागृह शिपाई : रिक्त पदे १८०० एकूण अर्ज ३,६१,४८३, महिला अर्जदार ८५,८०३