मुंबई : मुंबईतील चित्रपट वर्तुळात लोकप्रिय असलेले प्रसिद्ध समीक्षक रशिद इराणी यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. रशिद यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी आढळून आला. त्यांचे निधन शुक्रवारी ३० जुलैच्या आसपासच झाले असावे, असा त्यांच्या निकटवर्तीयांचा अंदाज आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंतांनी रशिद यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त के ले.

धोबीतलाव परिसरात रशिद इराणी एकटेच राहत होते, अशी माहिती त्यांचे मित्र रफीक इलियास यांनी वृत्तसंस्थेला दिली. त्यांचा मृतदेह स्नानगृहामध्ये आढळला. दररोज प्रेस क्लबला न चुकता येणारे रशिद गेले दोन-तीन दिवस तिथे फिरकलेच नाही. रविवारीही ते न आल्याने सोमवारी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले, असेही रफीक यांनी सांगितले.

चित्रपटकर्मीच्या नव्या-जुन्या पिढीशी ते जोडले गेले होते. चित्रपटाचे गाढे अभ्यासक असलेले रशिद इराणी चित्रपट पाहणे, त्यावर चर्चा करणे व त्यावर समीक्षणात्मक लिखाण यातच कायम रमत असत. चित्रपटांचा चालताबोलता ज्ञानकोश असलेल्या रशिद यांचे चित्रपटकर्मीशी नाते जोडले गेले होते. ते एका इराणी कॅ फे चे मालकही होते, मात्र सिनेमा हाच त्यांचा ध्यास होता आणि तीच त्यांची खरी ओळख ठरली.