प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सोमवारी नाहुशकुमार कोली (३७) याला अटक केली. नाहुशकुमार कोली चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात असल्याचे मुंबई मिररने म्हटले आहे. नाहुशकुमार कोलीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तो अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असल्याचे म्हटले आहे. त्याने दोन अंगरक्षकांच्या मदतीने कट रचला आणि ओमकार अर्णेची (२१)गोळी झाडून हत्या केली.

नाहुशकुमारचे ओमकारच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. नाहुशकुमारने दोन मराठी चित्रपटांसह एका भोजपुरी चित्रपटाची निर्मिती केली असून सध्या तो एका हिंदी चित्रपटाची निर्मिती करत होता. २८ एप्रिलला पनवेल पोलिसांना पनवेल-माथेरान रोडवर एक मृतदेह सापडला. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद असलेल्या कुठल्याही व्यक्तिशी या मृतदेहाचे वर्णन जुळत नव्हते. या मृतदेहाच्या डोक्यावर आणि पाठिवर गोळी लागल्याच्या जखमा होत्या.

पुण्याच्या येरवडा पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ति बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्या व्यक्तिच्या वर्णनाशी पनवेल पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन जुळत होते. पण पुणे पोलिसांकडे मृत व्यक्तिचा खूप तरुणपणीचा फोटो असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. जेव्हा आम्ही तक्रारदाराच्या घरी जाऊन मृतदेहाचे फोटो दाखवले तेव्हा त्याच्या भावाने लगेच ओळखले असे पनवेल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.

जेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा ओमकार आणि पत्नी सुधामध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे पोलिसांना समजले. २७ एप्रिलला हे जोडपे नवी मुंबईला काकींकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. पण सुधा त्याचदिवशी घरी आली व ओमकार बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ओमकार पुण्यातूनच बेपत्ता झाला असून आम्ही नवी मुंबईला गेलोच नाही असे तिने सांगितले.

पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरुन तपासले असता ते घटनेच्या दिवशी पनवेलला असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस चौकशीत सुधाचे काकीचा नवरा नाहुशकुमार कोलीबरोबर प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना समजले. नाहुशकुमार पनवेल उलवे येथे राहायला आहे. ओमकारला या प्रेमसंबंधांबद्दल समजल्यापासून त्यांच्यामध्ये सतत भांडणे व्हायची. नाहुशकुमार कोलीने सुधा आणि ओमकारला २७ एप्रिलला त्याच्या घरी बोलावले होते. सुधा पुण्याला परतली तर ओमकार तिथेच राहिला. त्यानंतर कोळीने त्याच्या अंगरक्षकाची बंदुक घेतली व ओमकारची गोळया झाडून हत्या केली.  नाहुशकुमारने दोन अंगरक्षकांच्या मदतीने पनवेल-माथेरान रोडवर निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिला. सुधाही या कटात सहभागी होती. ती फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.