जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर मुला-मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय अखेर ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने घेतला आहे. केवळ थाटामाटात भूमीपूजन करण्याच्या अट्टाहासामुळे फेब्रुवारीपासून बांधकामास सुरुवात होऊ शकली नव्हती. मात्र मंडळाने आता भूमीपूजनाचा अट्टाहास सोडून कार्यक्रमाशिवायच बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्याभरात वसतिगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शिक्षण, तसेच नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींची निवासाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने मुंबईत दोन ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. यापैकी एक वसतिगृह जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर बांधण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाचे कार्यादेश जारी झाले असून बांधकामाची पूर्वतयारीही पूर्ण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येणार होते. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पाचे भूमीपूजन रखडले.

हेही वाचा : मोठी बातमी! मनसेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई

तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर बांधकामास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र या प्रकल्पाचे भूमीपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा निर्णय तात्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. पण सुरुवातीला कार्यक्रमासाठी त्यांच्या तारखा मिळत नसल्याने भूमीपूजन रखडले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि त्यानंतर वसतिगृहाचे बांधकाम रखडले.नवे सरकार आल्यानंतरही भूमीपूजनाला मुहूर्त मिळू शकला नाही. अखेर आता कार्यक्रमाविनाच वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे आदेश मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या महिन्याभरात वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त

जिजामाता नगर वसतिगृहाच्या बांधकामाचे कंत्राट देऊन बरेच महिने झाले आहेत. त्यामुळे आता तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. – योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, ‘म्हाडा’

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारणार वसतिगृह
.१८ मजली इमारत
३७५ खोल्या, ५०० जणांची निवासाची व्यवस्था
१९ कोटी रुपये बांधकाम खर्च
खाणावळ, बँक, व्यायामशाळा, वाहनतळ आदी सोयी-सुविधा
बांधकामासाठी सी. बी. ॲण्ड सन्स कंपनीची नियुक्ती
वास्तुशास्त्रज्ञ म्हणून मेसर्स एस पी शेवडे ॲण्ड असोसिटची नेमणूक
बांधकाम सुरू झाल्यापासून दोन वर्षात वसतिगृह उभे राहणार