अनिल देशमुख यांच्या पत्नीची याचिका

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मालमत्तेवर टांच आणण्याविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्नी आरती यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी आपले म्हणणे ऐकले नसल्याबाबत अंमलजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी उच्च न्यायालयासमोर आक्षेप नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी ठेवली.

आरती देशमुख यांच्यातर्फे याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्याला नकार दिला होता. तसेच मालमत्तेवर टांच आणण्याचे आदेश देणाऱ्या प्राधिकरणाने या प्रकरणी सुनावणी पूर्ण करावी, परंतु याचिकेवर सुनावणी घेतली जाईपर्यंत अंतिम निर्णय देऊ नये, असे स्पष्ट करून आरती देशमुख यांना दिलासा दिला होता. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ईडीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी मध्यस्थी याचिका सादर केली.

प्रकरण काय?आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन प्राधिकरणातर्फे ९ डिसेंबरला देशमुख यांची मालमत्तेवर टांच आणण्याचे आदेश दिले जाणार आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. प्राधिकरण कायद्यानुसार काम करत नसल्याचा दावाही त्यांनी केला होता.