देशातील कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना जनतेमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करावी या हेतूने द मॅक्स फाऊंडेशनच्यावतीने कर्करोगाच्या जागरूकतेसाठी चहा आणि चर्चा या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी निधी जमा करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये कर्करोगाचे प्रकार त्यावरील उपचार अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
भारतीय समाजामध्ये चहाबरोबर सुरू असणारी चर्चा हे प्रत्येकाचा घरांमध्ये घडणारा प्रसंग आहे, त्या चर्चेतूनच घरातील व्यक्तींसोबत संवाद साधला जातो ज्यामुळे एकमेकांचे नाते अधिक घट्ट होते. याच धर्तीवर अनौपचारिक पद्धतीने लोकांशी चर्चा करून कर्करुग्णांना मदत करण्यासाठी अशा प्रकारची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी द मॅक्स फाऊंडेशनच्या प्रमुख विनी व्यकंटेश यांच्या ठाणे येथील घरामध्ये ८ मे रोजी कर्करोगाच्या जागरूकतेसाठी चहा आणि चर्चा आयोजित करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे व्यंकटेश ही मोहीम राबवीत असून यातून गरजूंना मदत मिळाली आहे. यासाठी सोसायटी, रेड एफ एम, रेडिओ वन यांचे सहकार्य मिळाले असल्याचे व्यकंटेश यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली असून हैदराबाद, पुणे, बिलासपूर, भोपाळ, कोलकाता, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी झाले आहे. ही मोहीम ३७ शहरांमध्ये घेण्यात आली असून आतापर्यंत ४० हजार मदतीचे हात चहा आणि चर्चाच्या निमित्ताने जोडण्यात आले आहेत. या वेळी मदतनिधी जमा करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनेही करता येणार आहे यासाठी chaiforcancer.org या संकेतस्थळावर आपली मदत पाठवावी.