मुंबई : संकेतस्थळावर स्वस्तात कार विक्रीची जाहिरात करून अनेकांना फसवणाऱ्या वितरकाविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गोरेगावसह पश्चिम उपनगरांतील अनेक ग्राहकांना या कंपनीने फसवल्याचे पोलिसांनी सांगितले.

महालक्ष्मी येथे कार्यालय असलेल्या रोहित भूलचंदानी यांना मर्सिडीज कार विकत घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी विविध संकेतस्थळांची चाचपणी केली. कार बाजार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संकेतस्थळावर स्वस्तात कार विक्रीची जाहिरात त्यांनी पाहिली. त्यांनी चौकशी केल्यावर कंपनीकडून त्यांना मर्सिडीज ई क्लास (२०१८ मॉडेल) कार ६४ लाख ४१ हजार रुपयांना उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. कार खूपच कमी दरात मिळत असल्याने भूलचंदानी व्यवहारासाठी इच्छुक होते.

कंपनीने त्यांच्याकडून १४ लाख रुपये आगाऊ घेतले. उर्वरित रकमेसाठी कर्जाची व्यवस्था कंपनीकडून होणार होती. भूलचंदानी यांनी ऑगस्ट २०१८मध्ये आगाऊ रक्कम भरली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना कारचा ताबा मिळणार होता. मात्र कार भिवंडी येथे असून विमा आणि नोंदणी प्रक्रिया अपूर्ण असल्याचे कंपनीने कळवले. ही प्रक्रिया पूर्ण करूनच कारचा ताबा मिळावा, अशी अपेक्षा भूलचंदानी यांनी व्यक्त केली. मात्र त्यानंतर बरेच दिवस लोटले तरी कारचा ताबा मिळत नव्हता. पाठपुरावा केल्यावर कंपनीकडून विविध सबबी सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होऊ लागला.

अशात नोव्हेंबरमध्ये कारची किंमत तीन लाख रुपयांनी वाढल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तेव्हा भूलचंदानी यांचा संशय बळावला. त्यांनी कारचे ‘बुकिंग’ रद्द करून आगाऊ रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, कंपनीने ना कार परत केली ना पैसे. अखेर भूलचंदानी यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. भूलचंदानी पोलीस ठाण्यात आले त्याच सुमारास आणखी चार ते पाच तक्रारदार कार बाजार इंडिया प्रा. लि. कंपनीविरोधात अशीच फसवणूक केल्याची तक्रार घेऊन आले होते. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वाहने उपलब्धच नाहीत?

चार ते पाच वर्षांपासून या कंपनीने वाहनविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्यक्षात कंपनीकडे ग्राहकांनी मागणी केलेली वाहने उपलब्ध नसावीत. फसवी जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करावे आणि त्यानंतर वाहने उपलब्ध करून द्यावीत, या पद्धतीने कंपनीने व्यवहार केल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करतात. आगाऊ रक्कम घेऊन ती अनेक महिने स्वत:कडे ठेवून कंपनीने काय केले, याचा तपास पोलीस करणार आहेत.