मुंबईः मालाड येथील शाळेमधील उद्वाहनात अडकून २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर अखेर मालाड पोलिसांनी याप्रकरणी गुरूवारी गुन्हा दाखल केला. उद्वाहनाची देखभाल करणाऱ्या कंपनीचा मालक व अभियंत्याविरोधात मालाड पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. पोलीस याप्रकरणी उद्वाहन परीक्षण अहवालाच्या प्रतीक्षेत होते. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जिनल फर्नांडिस, असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्यांचे पती बनीफेस फर्नांडिस यांच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उद्वाहनाची देखभाल करण्याचे काम क्लासिक इलेव्हेटर्स या कंपनीकडे होते. या कंपनीचे मालक राजाराम राणे व उद्वाहनाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेला अभियंता सुशीलकुमार चौधरी यांच्या विरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिनल फर्नांडिस यांच्या पतीच्या तक्रारीनुसार सर्व्हिस कार्डवरून जून २०२२ पासून उद्वाहनाची देखभाल करण्यात आली नव्हती. या निष्काळजीपणामुळे जिनलचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसानी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे निरीक्षक यांच्याकडून परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मालाड पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील चिंचळी सिग्नलजवळील सेंट मेरी इंग्रजी शाळेत १६ सप्टेंबरला दुपारी ही घडली होती. मृत शिक्षिका तासिका संपवून सहाव्या माळ्यावर असलेल्या शिक्षक कक्षात जात होत्या. यावेळी दार बंद होण्यापूर्वीच उद्वाहन वर गेले. त्यामुळे या शिक्षिका लिफ्टमध्येच अडकल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उद्वाहनात अडकल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने धावपळ केली आणि त्यांना बाहेर काढले. यानंतर जखमी अवस्थेत त्यांना लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले होते. जिनल फर्नांडिस दोन महिन्यांपूर्वीच या शाळेत सहाय्यक शिक्षिका पदावर रुजू झाल्या होत्या.