मुंबई : अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी झालेल्या गोंधळानंतर प्रवेशद्वाराबाहेरील सर्व महिला उमेदवारांना आतमध्ये प्रवेश देऊन पुन्हा त्यांची उंची मोजण्यात आली. यातील पात्र ठरलेल्या १६ महिला उमेदवारांना १४ फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आले आहे. या पात्र १६ उमेदवार सकाळी ८.२०च्या सुमारास रविवारी उपस्थित होत्या, असे चित्रीकरणांमध्ये सिद्ध झाले तरच त्यांना उंचीच्या प्राथमिक चाचणीत पात्र ठरवून, पुढील चाचणीसाठी परवानगी देण्यात येईल.
अग्निशामक संवर्गातील ९१० पदांसाठी, पुरुष व महिला उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया दिनांक १३ जानेवारीपासून सुरू होती. दहिसर (पश्चिम) मधील गोपीनाथ मुंडे मैदान या ठिकाणी राबवलेल्या या भरती प्रक्रियेसाठी सकाळी आठ वाजेपर्यंत प्रवेशद्वाराजवळ रांगेत उपस्थित शेवटच्या उमेदवारास आत प्रवेश दिला जातो. वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.
महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना अंदाजे ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार उंचीची प्रथम चाचणी केल्यानंतर एकूण ३ हजार ३१८ महिला उमेदवारांना प्रथम दर्शनी पात्र करून मैदानामध्ये दाखल करून घेतले. या भरतीसाठी महिला उमेदवारांच्या बाबतीत उंची १६२ सेंमी, वजन किमान ५० किलो हे दोन अंतिम निकष तपासले जातात. या निकषांमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच पुढील मैदानी चाचणीसाठी पाठवले जाते. निकष पूर्ण न करणारे उमेदवार अपात्र ठरतात. मात्र शनिवारी ज्या महिला उमेदवार उंचीच्या प्रथम चाचणीत अपात्र झाल्या. त्या आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रवेशद्वाराबाहेर बैठे आंदोलन करीत घोषणाबाजी सुरु केली. तसेच त्यांनी घरी जाण्यास नकार दिला. त्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेत मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक अडथळे लोटण्यास सुरुवात केली. जमावातील एका पुरुषाने महिला पोलीस शिपायास पकडून धक्काबुक्कीही केली.
त्यानंतर उंचीच्या प्राथमिक चाचणीत अनुत्तीर्ण महिला उमेदवारांची उंचीची फेरचाचणी डॉक्टर आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी पुन:पुन्हा केली. पोलीस, उपस्थित लोकप्रतिनिधी आणि मुंबई अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व महिला उमेदवार व इतर जमावास देखील संपूर्ण भरती प्रक्रिया पुन्हा समजावून सांगितली. तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा २२५ महिला उमेदवारांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. महानगरपालिकेचे डॉक्टर आणि प्रमाणित साधन यांच्या सहाय्याने पुन्हा उंची मोजण्यात आली. त्यात पात्र ठरलेल्या १६ महिला उमेदवारांना आता १४ फेब्रुवारी रोजी बोलाविण्यात आले आहे. या १६ महिला उमेदवार शनिवारी सकाळी ८.२०च्या आत उपस्थित होत्या का याची चित्रीकरणात फेरतपासणी करून शहानिशा करण्यात येणार आहे.