मुंबई : मुंबईतील नौदल गोदीमधील एका कचरा साठवण यार्डमध्ये गुरुवारी रात्री १०.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
दुर्घटनेचे वृत्त समजताच नौदलाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. नौदलाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थली धाव घेतली. काहीच क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे. नौदलाने याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली.
मुंबईतील नौदल गोदी हे देशाच्या सागरी संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. याच ठिकाणी भारतीय नौदलाचे प्रमुख केंद्र आहे. अरबी समुद्रात होणाऱ्या संशयास्पद किंवा शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात या नोंदल गोदीची भूमिका निर्णायक मानली जाते. विमानवाहू युद्धनौका, आधुनिक युद्धनौका, तसेच पाणबुड्यांची दुरुस्ती आणि देखभाल याच परिसरात केली जाते. त्यामुळे या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे सुरक्षेबाबतचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

