मुंबई : देशभरात प्रवासादरम्यान खासगी किंवा सार्वजनिक बसगाड्यांना आग लागल्याने जीवितहानीबरोबरच वित्तहानीही बऱ्याच वेळा झाली आहे. अनेक घटनांमध्ये आगप्रतिबंधक साधने नसल्याने आगीवर नियंत्रणही मिळविता आले नाही. मात्र यापुढे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असून नव्याने येणाऱ्या सर्व बसगाड्यांमध्ये आगप्रतिबंधक साधने बंधनकारक असून तशी प्रारूप अधिसूचना भूषृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काढली आहे. ही यंत्रणा १ एप्रिल २०२२ पासून किंवा त्यानंतर नव्याने येणाऱ्या बसगाड्यांसाठी असेल.

बसमधील प्रवासादरम्यान आग लागणे किंवा धूर येण्याच्या घटना घडतात. या प्रकारात अनेकदा प्रवाशांनाही इजा होते. मात्र, आगप्रतिबंधक साधने नसल्याने धोका अधिक वाढतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमधून बाहेर येण्यासाठी दोन ते तीन मिनिटांचा अवधी लागतो. या सगळ्या पाश्र्वभूमीवर मंत्रालयाने काढलेल्या प्रारूप अधिसूचनेत आग लागताच भोंगा (अलार्म) वाजणारी यंत्रणा बसविण्याची सूचना केली आहे. आग विझवणारी पाणी किंवा रासायनिक प्रक्रिया यंत्रणा बसवण्याचाही सूचनेत समावेश आहे. ही यंत्रणा सध्याच्या काही बसमधील पुढील भागात असते. आता टाइप तीन प्रकारांतील बसगाड्यांमध्ये म्हणजे लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसगाड्यांसाठीच अनिवार्य केली असून ती मागील बाजूसही बसविणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान एखादी आगीची घटना घडल्यास शेवटच्या प्रवाशांपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट केले.

याशिवाय शालेय बसगाड्यांसाठी आगप्रतिबंधक साधने बंधनकारक केली आहेत. प्रारूप अधिसूचना काढल्यानंतर प्रत्येक राज्यांकडून साधारण एका महिन्यात याबाबत मते मागविली आहेत. १ एप्रिल २०२२ पासून नव्याने उत्पादन होऊन येणाऱ्या बससाठी ही यंत्रणा असेल.