ठाण्यात फटाक्यांचा दणदणाट; मुंबईतील ध्वनिप्रदूषणात मात्र किंचित घट

मुंबईतील टाळेबंदीपूर्व काळातील २०१९मधील दिवाळीच्या तुलनेतही यंदा कमी ध्वनिप्रदूषणाची  नोंद करण्यात आली.

मुंबईतील ध्वनिप्रदूषणात मात्र किंचित घट

मुंबई/ठाणे : मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले असले तरीही ध्वनिप्रदूषणात किंचित घट नोंदवण्यात आली, तर ठाणे शहरातील उच्चभ्रू वसाहतींमधील फटाक्यांच्या आतषबाजीने मात्र ध्वनिप्रदूषणाची धोकापातळी ओलांडली.   

मुंबईतील टाळेबंदीपूर्व काळातील २०१९मधील दिवाळीच्या तुलनेतही यंदा कमी ध्वनिप्रदूषणाची  नोंद करण्यात आली. ‘आवाज फाऊंडेशन’ने ४ नोव्हेंबरला केलेल्या ध्वनी पातळी मोजणीनुसार वांद्रे, माहीम, वरळी, दादर, शिवाजी पार्क, बाबुलनाथ आणि मरिन ड्राइव्ह या ठिकाणी आढळलेली आवाजाची कमाल पातळी गतवर्षीपेक्षा कमी होती. रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी शिवाजी पार्क येथे १००.४ डेसिबल इतकी आवाजाची कमाल पातळी होती.

 ठाणे शहरात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध मार्गांनी जनजागृती करण्यात येत असली तरी यंदा उच्चभ्रू वसाहतींमध्ये फटाक्यांच्या आवाजाने पातळी ओलांडली. ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट आणि वसंत विहार येथील हिरानंदानी मिडोज या भागात फटाक्यांच्या आवाजाची पातळी १०० ते १०५ डेसिबलपर्यंत पोहचली होती. विशेष म्हणजे हे दोन्ही भाग उच्चभ्रूंच्या वसाहतींचे आहेत. हिरानंदानी इस्टेट भागात पहाटे ३ वाजेपर्यंत फटाके फोडण्यात आले, असेही या सर्वेक्षणात नमूद केले आहे.

मुंबईत पोलीस उपस्थित नसल्याने शिवाजी पार्क मैदानात रात्री १० वाजल्यानंतरही फटाके फोडले जात होते. याउलट, मरिन ड्राइव्ह येथे पोलीस बंदोबस्त असल्याने रात्री १० वाजण्याच्या आधीही हा परिसर गेल्यावर्षीच्या तुलनेत शांत होता. इतर ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तुरळक फटाके फोडण्यात आले. रहिवाशांच्या तक्रारीनुसार वांद्रे, पवई येथे रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. दिवाळीतील फटाक्यांच्या कमाल ध्वनी पातळीचा विचार करता २०१९ साली मरिन ड्राइव्ह येथे ११२.३ डेसिबल तर, २०२० साली शिवाजी पार्क येथे १०५.५ डेसिबल आवाज होता. यावर्षी मात्र सर्वांत कमी १००.४ डेसिबल ध्वनी पातळी शिवाजी पार्क येथे होती. वांद्रे येथे दुपारी ४.१६ वाजता फटाकेरहीत वातावरणात पीएम २.५चे (घातक सूक्ष्मकण) प्रमाण ७४ मायक्रोग्रॅम घनमीटर होते तर, रात्री ८.५५ वाजता शिवाजी पार्क येथे फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना त्यांचे प्रमाण ३४० मायक्रोग्रॅम घनमीटरपर्यंत पोहोचले होते.

ठाणे शहरातील नौपाडा येथील राम मारूती रोड आणि गोखले रोड परिसरात फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक असते. राममारूती रोड येथे ९५ डेसिबल पर्यंत तर, गोखले रोड येथे ९५ ते १०० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. पाचपाखाडी येथे ९० डेसिबल, कोपरी येथील आनंद सिनेमा परिसरात ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले होते. मात्र, यंदा हे प्रमाण वाढल्याचेही समोर आले आहे.

नौपाडा येथील राम मारूती रोड आणि गोखले रोड, पाचपाखाडी, कोपरी, वसंत विहार येथील हिरानंदानी मेडोज, घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट या भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते पहाटे ३ वाजेपर्यंत आवाजाची पातळी मोजण्यात आली. त्यात सर्वाधिक पातळी हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मेडोज या भागात नोंदविण्यात आली. या दोन्ही ठिकाणी १०० ते १०५ डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद करण्यात आली.

मुंबई सातवे प्रदूषित शहर

’‘आयक्यू एअर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या यादीनुसार शुक्रवारी मुंबई हे जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.

यावेळी मुंबईचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ १६९ होता तर, ४२६ निर्देशांकासह दिल्ली शहर पहिल्या स्थानावर होते. शनिवारी देशातील आणखी एका शहराचा या यादीत समावेश झाला.

’३३५ निर्देशांकासह दिल्ली पहिल्या स्थानावर, कोलकाता १६० निर्देशांकासह पाचव्या स्थानावर तर, मुंबई १५७ निर्देशांकासह सहाव्या स्थनावर होते.

गेल्या तीन ते चार वर्षांत फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, यंदा हे प्रमाण पुन्हा वाढल्याचे आढळले. – डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते. ठाण्यात उच्चभ्रू वस्तीत सर्वाधिक ध्वनीप्रदूषण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Firecrackers in thane slight reduction in noise pollution in mumbai however akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या