मुंबई अग्निशमन दलातील जवान योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छिंद्र शेळके या दोघांनी युरोपातील सर्वोच्च पर्वत शिखर माऊंट एल्ब्रस भारताच्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी सर केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून खडतर हवामानाचा सामना करीत या दोघांनी या शिखरावर राष्ट्रध्वज आणि अग्निशमन दलाचा धज फडकावला.

हेही वाचा – मुंबई : आरे वसाहतीमधील कारशेडविरोधात राष्ट्रवादीही रस्त्यावर

मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छिंद्र शेळके या दोन्ही अग्निशमन जवानांना गिर्यारोहणाची आवड आहे. अग्निशमन सेवेत २०१७ मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शारीरिक आणि मानसिक क्षमता जोपासण्यासाठी गिर्यारोहणाचा सराव कायम ठेवला आहे. जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च पर्वत शिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय आहे. यापूर्वी या दोघांनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलोमांजारो स्वतंत्ररित्या यशस्वीपणे सर केले होते. आता रशियामधील नैऋत्येकडे असलेले माउंट एल्ब्रस एकाच वेळी पादाक्रांत करून त्यांनी आणखी एक बहुमान संपादीत केला आहे.

माउंट एलब्रस हे युरोपात काकेशस पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १८ हजार ५०५ फूट) आहे. रशियाच्या नैऋत्येला स्थित आणि काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांच्या मध्ये वसलेल्या या शिखरावरील हवामान प्रचंड लहरी आहे. वर्षभर सातत्याने येणारी हिम वादळे, उणे २५ अंशापर्यंत घसरणारे तपमान आणि शरीर गोठवून टाकणारी थंडी, त्यामुळे अनेक गिर्यारोहकांना तेथे प्राण गमवावे लागले आहेत. असे असूनही योगेश बडगुजर आणि प्रणित शेळके यांनी हे आव्हान स्वीकारले.

हेही वाचा – ‘चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत भुरट्या चोरांची हातसफाई ; ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल

महानगरपालिकेची आवश्यक ती परवानगी घेऊन हवाई मार्गे १० ऑगस्ट २०२२ रोजी या दोघांनी रशिया गाठले. तेथे स्थानिक प्रशासनाची अधिस्वीकृती प्राप्त करण्याची प्रक्रिया आणि गिर्यारोहणाची प्राथमिक चाचणी पार पाडली. भारतीय स्वातंत्र्य दिनी शिखरावर पोहोचायचे या निर्धाराने १४ ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्री नंतर १ वाजता गराबासी या बेस कॅम्पपासून त्यांनी एल्ब्रस शिखराकडे वाटचाल सुरू केली. संपूर्ण प्रवासादरम्यान दृश्यमानता फारच कमी झाली. १५ फुटाच्या अंतरापलीकडे काहीही दिसत नव्हते. ४५ ते ५० किलोमीटर प्रती तास वेगाने आणि हिमकणांसह वाहणारे बोचरे वारे, उणे २५ ते ३० अंश तापमान, वेगवान वाऱ्यामुळे बर्फाचा होणारा मारा अशा खडतर आव्हानांचा सामना करीत १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता (स्थानिक रशियन वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता) योगेश बडगुजर आणि प्रणित शेळके शिखरावर पोहोचले. तेथे त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज फडकवला. शिखरावर पोहोचण्यास त्यांना तब्बल आठ तास लागले आणि परत बेस कँपवर ते दुपारी १.३० वाजता पोहोचले. सलग सुमारे १२.३० तास खडतर हवामानाचा सामना करून या दोघांनी आपले ध्येय पूर्ण केले. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या चार जणांच्या भारतीय चमूशिवाय इतर कोणालाही शिखर गाठणे शक्य झाले नाही. खडतर हवामानामुळे इतर देशातील चार संघांनी अर्ध्यातून माघार घेतली.

बडगुजर आणि शेळके यांच्या यशाबद्दल मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सह आयुक्त (सुधार) केशव उबाळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.