अखिल भारतीय मराठी साहित्य, संत साहित्य, दलित साहित्य, स्त्री साहित्य अशा विविध साहित्य संमेलनांमध्ये आता कृषी साहित्य संमेलनाची भर पडली आहे. राज्य शासनाचा कृती विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रा. रं. बोराडे हे संमेलनाध्यक्ष असून राज्याचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. कृषी धोरण, कृषीवेध, कृषी माहिती आणि तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, जलसिंचन धोरण, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिग, सेंद्रीय शेती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सौर ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
कृषी क्षेत्राशी संलग्न संस्था आणि कृषी धोरण, पर्यावरण आणि कृषी विकासाला पुरक अन्य क्षेत्रातील व्यक्तींना या संमेलनात ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषीरत्न’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिला संस्थांचाही यावेळीगौरव करण्यात येणार आहे.