मुंबईमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता.
मुंबईमधील या महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झालाय. राज्याच्या आरोग्य विभागाने करोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सींगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांचा शोध सुरु केला. याच चाचण्यांदरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली. कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालाय.




“६३ वर्षीय महिला रुग्णाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झालाय. आम्ही या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचं कॉनटॅक्ट ट्रेसिंग केलं आहे. त्यापैकी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालाय. इतरांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत,” अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिलीय. डेल्टा व्हेरिएंटमुळे मुंबईत झालेला हा पहिला मृत्यू असल्याचंही गोमारे यांनी म्हटलं आहे.
या महिलेला श्वसनासंदर्भात त्रास असल्याने तिला घरीच ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तिची करोना चाचणी २१ जुलै रोजी पॉझिटीव्ह आली. २४ जुलै रोजी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं जिथे तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.
एन वॉर्डचे आरोग्य अधिकारी डॉ. महिंद्रा खंडाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या महिलेला अधी विक्रोळीतील गोदरेज मेमेरियल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलेलं. या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांनी ब्रिच कँण्डी रुग्णालयामध्ये दाखल केलं. तिथेच या महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.
डेल्डा प्लस हा करोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट आहे. राज्यामध्ये बुधवारी डेल्टा प्लसचे २० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी मुंबईमध्ये सात तर पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी सहा रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावमध्ये आढळून आलेत. येथे डेल्टा प्लसचे १३ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल रत्नागिरी (१२), मुंबई (११), ठाणे (६), पुणे (६) तसेच चंद्रपूर, अकोला, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीडमध्येही रुग्ण आढळून आलेत. गोंदिया, नांदेड, रायगडमध्ये प्रत्येकी दोन तर पालघरमध्ये तीन रुग्ण आढळून आलेत.