scorecardresearch

पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद मुंबईत ;क्रूझ हब म्हणून भारताची ओळख निर्माण करण्याचे मंत्र्यांचे सूतोवाच

भारताला मोठय़ा प्रमाणावर नितांतसुंदर अशी किनारपट्टी लाभली असून येथील जल, समुद्रपर्यटनाकडे जागतिक पर्यटकांचा कल वाढत आहे.

(मुंबई बंदर प्राधिकरणातर्फे परिषदेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.)

मुंबई : भारताला मोठय़ा प्रमाणावर नितांतसुंदर अशी किनारपट्टी लाभली असून येथील जल, समुद्रपर्यटनाकडे जागतिक पर्यटकांचा कल वाढत आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांत येथील क्रूझ पर्यटनात दहा पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने येत्या काळात भारताला क्रूझ हब म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबईत देशातील पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद आयोजित करण्यात आली आहे. १४ आणि १५ मे रोजी ही परिषद पार पडणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
जगभरात सध्या समुद्र पर्यटन वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. यात क्रूझ पर्यटनास पर्यटकांची पसंती मिळत असल्याने हा व्यवसायही तेजीत आहे. हीच संधी ओळखून केंद्र सरकारने क्रूझ पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच सागरमाला योजनेंतर्गत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. चेन्नई, अंदमान बंदराला गोव्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोव्याला पर्यटकांची अधिक पसंती असल्याने हा प्रयत्न केला जात असल्याचे या वेळी सर्बानंद सोनोवाल म्हणाले.
बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, मुंबई बंदर प्राधिकरण आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये १४ आणि १५ मे रोजी पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First international cruise conference mumbai ministers ploy india identity cruise hub amy

ताज्या बातम्या