मुंबई : पसंतीक्रम भरताना आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यापैकी ३९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला आहे.
नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेले वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला एकामागून एक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी संधी दिली होती. त्यानुसार राज्यभरातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ५९ हजार १३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्यांपैकी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २९ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम भरायचे होते. मात्र २९ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरताना तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत वाढीव कालावधी देण्यात आला.
हेही वाचा – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी राज्यभरातून ३९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला आहे. दरम्यान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून या अभ्यासक्रमााची पहिली यादी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १ सप्टेंबरपासून महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
राज्यामध्ये एमबीबीएसच्या ७ हजार ३२४, तर बीडीएसच्या २ हजार ६७५ जागा आहेत. पहिल्या फेरीसाठी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी राज्यभरातून ३९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला आहे. त्यामुळे या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.