मुंबई : घनदाट जंगलात पाण्यातून धावणारे, हातात दिवट्या घेऊन केलेला नाच, कातळशिल्प, खाणकाम, पौराणिक चित्रे आणि गूढ विचारात नेणारे पार्श्वसंगीत कानावर पडत ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाची पहिलीवहिली झलक समोर आली आहे. त्यामुळे एकूणच देवभूमी कोकणात साकारलेली नेमकी कोणती भव्य कथा? ‘दशावतार’ चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार, यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच ‘दशावतार’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू आदी वैविध्यपूर्ण भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत करणारे दिग्गज अभिनेते ‘दिलीप प्रभावळकर वयाच्या ८० व्या वर्षी एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या अवतारातील दिलीप प्रभावळकर यांचे छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध झाल्यानंतर चित्रपटाबाबत रसिकांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली.
त्यानंतर आता चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यानंतर दिलीप प्रभावळकर यांची भूमिका नेमकी काय असेल? कोकणातील लोककला असलेल्या दशावतारी नाटकांचा धागा हा कथेत कशा पद्धतीने जोडलेला असेल ? दशावतारी कलाकारांचे कोणते नवे भावविश्व मोठ्या पडद्यावर उलगडणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे कोकणच्या भव्यतेचा अनुभव प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य, तिथल्या रूढी-परंपरा, लोककलांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट असून त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारक कथानकाची जोड देण्यात आली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत.
अभिनेत्यांना वयाची मर्यादा नसते
‘दशावतार’ चित्रपटात आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी, आव्हानात्मक आणि सगळ्यांना चकित करणारी आहे, याचा आनंद आहे. वयाची मर्यादा अभिनेत्यांना नसते, नवनवीन भूमिका आणि आव्हाने मला खुणावत असतात. याप्रमाणेच हे एक भव्य आव्हान आहे. – दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते.