scorecardresearch

मुंबईत ‘एक्सई’बाधित पहिला रुग्ण; पालिकेचा दावा केंद्रीय आरोग्य विभागाने मात्र फेटाळला

मुंबईत करोनाच्या ‘एक्सई’ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केले.

मुंबई : मुंबईत करोनाच्या ‘एक्सई’ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केले. मुंबई पालिकेच्या कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत केलेल्या जनुकीय चाचण्यांमध्ये हा रुग्ण ‘एक्सई’बाधित आढळल्याचा दावा पालिकेने केला़  मात्र, तो केंद्राने फेटाळून अधिक तपासासाठी त्याचे जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठविण्याचे आदेश कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला दिले. मुंबईतील २३० रुग्णांच्या जनुकीय चाचण्यांचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात २३० पैकी २२८ म्हणजेच ९९ टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची तर दोन रुग्णांना ‘एक्सई’ आणि ‘कप्पा’ या करोना विषाणूच्या उपप्रकारांची बाधा झाल्याचे मुंबई पालिकेने अहवालात जाहीर केले.

मुंबईत ५० वर्षीय महिलेला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळले असून, ही महिला दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे. चित्रिकरणासाठी १० फेब्रुवारीला ती भारतात आली होती. त्यावेळी तिला करोनाची बाधा झालेली नव्हती. परंतु, चित्रीकरणादरम्यान नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता तिला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचे आढळले. ३ मार्चला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या़  तिला कोणतीही लक्षणे नव्हती़

‘एक्सई’ म्हणजे काय?

एक्सई हा करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकाराचाही उपप्रकार आहे. ओमायक्रॉनच्या बीए.१ आणि बीए.२ या उपप्रकारांचे उत्परिवर्तन होऊन एक्सई हा विषाणू निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ जनुकीय घटकांचे मिश्रण झाल्याचे आढळले आहे. ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार १९ जानेवारी २०२२ रोजी आढळला होता. जगभरात या विषाणूचे सहाशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आत्तापर्यत आढळलेल्या करोना विषाणूच्या प्रकारामध्ये हा सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे. परंतु याबाबत अद्याप पुरेशी माहिती नसल्यामुळे ब्रिटनमधील संशोधकांनाही याची तीव्रता, पसरण्याचा वेग याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे सांगितले.

केंद्रीय आरोग्य विभागाने नाकारले

जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांचा अभ्यास करणारी इंडियन सार्स-सीओव्ही२ जिनोमिक्स   कन्सॉर्रिटयम (आयएनएसएसीओजी) या संस्थेतील तज्ज्ञांच्या मते या रुग्णाचे जिनोम चाचणीचा अहवाल एक्सईच्या जिनोमनुसार नाहीत. त्यामुळे या रुग्णाला एक्सई या उपप्रकाराची बाधा झाली आहे, असे म्हणता येणार नाही. ‘आयएनएसएसीओजी’ची संध्याकाळी बैठक झाली असून, यामध्ये कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री सहभागी झाल्या होत्या. कस्तुरबा प्रयोगशाळेतील अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी नमुने पुन्हा पाठविण्याची मागणी या बैठकीत केली आहे.

पुढील तपासणीसाठी अहवाल पाठविणार

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्राथमिक तपासणीनंतर हे अहवाल जागतिक पातळीवरील जनुकीय चाचण्यांचा अभ्यास करणाऱ्या ‘जीआयएसएआयडी’ या संस्थेलाही पाठविले होते. या संस्थेनेही या रुग्णाला ‘एक्सई’ आढळल्याचे निश्चित केले आहे. तरी खात्री करण्यासाठी ‘आयएनएसएसीओजी’च्या मागणीनुसार हे अहवाल पुन्हा त्यांना पाठविले जाणार आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

‘भारताला धोका नाही’

बीए.१ आणि बीए.२ हे दोन्ही उपप्रकार देशभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आढळत आहेत. त्यामुळे त्यांचेच गुणधर्म असलेल्या नव्या विषाणूपासून सध्या कोणताही धोका आहे, असे वाटत नाही. तिसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या बाधित झाल्यामुळे करोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने तरी भारताला विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका नाही, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले. ही महिला महिनाभरापूर्वी बाधित आढळली होती़  या विषाणूचा प्रसार वेगाने झाला असता तर मुंबईतील रुग्णसंख्या वेगाने वाढली असती. परंतु, तसे झालेले नाही. त्यामुळे या विषाणूपासून फारसा धोका नाही, असे मृत्यूविश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First patient infected xe mumbai claim municipality rejected central health department ysh