scorecardresearch

‘मेट्रो ३’ लवकरच मुंबईत धावणार; वाचा कशी ती…

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात नऊ गाड्या चालविण्यात येणार असून यापैकी एक गाडी यापूर्वीच आंध्र प्रदेशातील श्रीसिटीवरून मुंबईत दाखल झाली आहे.

‘मेट्रो ३’ लवकरच मुंबईत धावणार; वाचा कशी ती…
प्रातिनिधिक छायाचित्र

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात नऊ गाड्या चालविण्यात येणार असून यापैकी एक गाडी यापूर्वीच आंध्र प्रदेशातील श्रीसिटीवरून मुंबईत दाखल झाली आहे. सध्या दुसरी गाडी तयार झाली असून ही गाडी लवकरच मुंबईत आणण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन सुरू आहे.

हेही वाचा >>>मुंबई: सोनसाखळी, मोबाइल चोरणाऱ्या पाच सराईत आरोपींना अटक

‘मेट्रो ३’ मार्गिका दोन टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. बीकेसी – सीप्झ हा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्यात येणार आहे. याअनुषंगाने एमएमआरसीने कामाला वेग दिला आहे. वर्षभरात ‘मेट्रो ३’ सेवा सुरू करण्यात येणार असून या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्या मुंबईत आणून त्यांची जोडणी आणि चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे मेट्रो गाड्या मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, ‘मेट्रो ३’मधील कारशेडचा प्रश्न सुटत नसल्याने मेट्रो गाड्या ठेवयच्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता कारशेडचा प्रश्नही मार्गी लागला असून कारशेड काम वेगाने पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>>मुंबईः तरुणीचा विनयभंग करून अश्लील चित्रीकरण प्रसारित धमकी

एमएमआरसीने ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाड्यांची बांधणी करण्याचे कंत्राट श्रीसिटीतील एका कंपनीला २०१७-२०१८ मध्ये दिले आहे. सुमारे २,५१६ कोटी रुपयांचे हे कंत्राट आहे. या कंत्राटानुसार श्रीसिटीत ‘मेट्रो ३’च्या गाड्यांची बांधणी सुरू आहे. श्रीसिटीतून पहिली गाडी यापूर्वीच मुंबईत आली असून आता दुसरी गाडी मुंबईत येण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती एमएमआरसीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही गाडी ठेवण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात येत आहे. ते झाले की तात्काळ गाडी मुंबईत आणण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नऊ गाड्या धावणार आहेत. त्यामुळे आता आठ गाड्या टप्याटप्याने मुंबईत आणण्याचा एमएमआरसीचा मानस आहे.

मेट्रो गाडीचे वैशिष्ट्य

आठ डब्यांची गाडी

१८० मीटर लांब गाडी

३.२ मीटर रुंद गाडी

एकूण प्रवाशी क्षमता २४००

वेग ताशी ८५ किमी

स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आल्याने गाडी ३५ वर्षे टिकणार

रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल
पूर्णतः वातानुकूलित गाडी

स्वयंचलित गाडी

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:23 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या