scorecardresearch

जलबोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण; अमर महल ते ट्रॉम्बे

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंतच्या जलबोगद्याच्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचे खनन शुक्रवार, ६ मे रोजी पूर्ण झाले.

प्रतिनिधीक छायाचित्र

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंतच्या जलबोगद्याच्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचे खनन शुक्रवार, ६ मे रोजी पूर्ण झाले. गेल्या वर्षी ६ मार्चला या जलबोगद्याचे काम सुरू झाले होते. या प्रकल्पाचे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे देवनार, चेंबूर, कुर्ला व परळ परिसरातील पाणीपुरवठय़ात सुधारणा होणार आहे.
मुंबईची भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईत पालिकेतर्फे अनेक ठिकाणी जलबोगदे तयार केले जात आहेत. त्याअंतर्गत घाटकोपर पूर्व येथील हेडगेवार मैदान (अमर महल) ते प्रतीक्षा नगर, वडाळा आणि तेथून पुढे परळच्या सदाकांत ढवण उद्यानापर्यंत ९.६ किलोमीटरचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हेडगेवार मैदान ते आरसीएफ आणि आरसीएफ ते बीएआरसी ट्रॉम्बे दरम्यान साडेपाच किलोमीटरचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. त्यापैकी दुसऱ्या जलबोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.
पूर्व उपनगरातील गोवंडी, देवनार, मानखुर्द, चेंबूर व कुर्ला येथील काही भागांत पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी व भविष्यातील वाढीव पाणीपुरवठय़ाचा विचार करून, पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत असा एकूण सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येत आहे.
या जलबोगदा प्रकल्पांतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर. सी. एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र (भाभा अॅलटॉमिक रिसर्च सेंटर) येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱ्या कूपकाचे काम प्रगतिपथावर आहे.
बोगद्याच्या खोदकामासाठी, हेडगेवार उद्यान येथील कूपकात बोगदा खनन यंत्र उतरविण्यात आले आहे. जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर हा जलबोगदा बांधण्यात येत आहे. त्याचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या बोगद्याच्या खोदकामात अनेक भूगर्भीय अडचणी आलेल्या असतानादेखील जानेवारी २०२२ या महिन्यात विक्रमी ६५३ मीटर खनन करण्यात आले होते. त्याच वेळी एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरीदेखील एकाच आठवडय़ात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने केली होती. पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर खनन पालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झालेले असून, ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First phase waterway completed amar mahal trombay watershed project amy