मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आनंद दिघे यांच्या संपत्तीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनाही पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप देशपांडे म्हणाले, “आनंद दिघेंबाबत त्यावेळी काय झालं आणि काय नाही हे मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. जो अनुभव माणसाला स्वतःला येतो त्यावर बोलू शकतो, जो इतरांचा अनुभव आहे त्यावर मी बोलू शकत नाही.”

आनंद दिघे यांच्या वाहनाला नवसंजीवनी

एकनाथ शिंदेंनी नेमके काय आरोप केले होते?

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलो, तेव्हा त्यांनी विचारपूस करण्याऐवजी आनंद दिघेंची संपत्ती कुठे-कुठे आहे? याबाबत विचारलं, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मी पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले? याबद्दल मी आजपर्यंत कुणालाही बोललो नाही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ते दिघेसाहेबांनी ठाण्यात पक्ष कसा वाढवला? संघटना कशी वाढवली? कसे काम करत होते? आता ठाणे जिल्ह्यात आपल्याला काय करावं लागेलं? असं विचारतील असं मला वाटलं. पण त्यांनी मला काय विचारलं? तर आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे? कुणाच्या नावावर आहे?”

“आहो, आनंद दिघे यांचं बँकेत खातंही नव्हतं. मी आजही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी हे विचारल्यानंतर मला धक्काच बसला, मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही. ज्या काळात दिघेसाहेबांची लोकप्रियता वाढत होती. त्या काळात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं नाही, असं म्हणत होते, पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे पक्षात जे-जे कार्यकर्ते मोठे होतात त्यांना कापा, त्यांना आडवे करा, असं काम उद्धव ठाकरेंनी केलं. पण तुम्ही त्यांचे पाय कापत असताना पक्षाचे पायही कापत होता, हे विसरून गेलात,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

“२०१७ मध्ये शिवसेना-मनसे युतीसाठी आम्हाला मातोश्रीवर बोलावलं”

यावेळी संदीप देशपांडेंनी आनंद दिघेंच्या प्रकरणावर बोलणं टाळलं असलं तरी स्वतःचा अनुभव सांगत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “२०१७ मध्ये मी आणि स्वतः संतोष दुरी आम्हाला मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं सांगण्यात आलं.”

Photos : आनंद दिघेंची संपत्ती कुणाच्या नावावर ते बापाला विकण्याचा आरोप, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, वाचा…

“युतीबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”

“त्यावेळी आमच्याशी बोलणी केली आणि आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. त्यामुळे बाकी मला काही माहिती नाही, मात्र खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की,” असा आरोप संदीप देशपांडेंनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First reaction of mns sandeep deshpande on allegations of cm eknath shinde about anand dighe property on uddhav thackeray rno news pbs
First published on: 06-10-2022 at 16:02 IST