मुंबई : दुर्मीळ अशी लहान आतडय़ाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात नुकतीच करण्यात आली. मुंबईतील अशा स्वरूपाची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. जे.जे. रुग्णालयात मेंदूमृत झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिल्याने अनिर्बन सामंता यांना पुन्हा नवे जीवन मिळाले आहे.

कोलकत्याचे रहिवासी असलेल्या अनिर्बन यांना एप्रिल २०२२ मध्ये आतडय़ामध्ये सुपीरियर मेसेंटरिक आर्टरी थ्रोम्बोसिसचे निदान झाले. यामुळे गँगरीन झाल्याने लहान आतडे काढून टाकावे लागले. कोलकत्यामध्ये ही शस्त्रक्रिया झाली. यावर आतडे प्रत्यारोपण हा एकमेव उपाय असून यासाठी मुंबईलाच जाण्याचा पर्याय तेथील डॉक्टरांनी सुचविला. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार परळच्या ग्लोबल रुग्णालयात हे कुटुंब दाखल झाले. १८ मे रोजी जे.जे. रुग्णालयातील मेंदूमृत रुग्णाच्या नातेवाईकांनी लहान आतडे दान करण्याची परवानगी दिल्याने अनिर्बन यांच्यावर लहान आतडे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असल्याने जगभरात या शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण दुर्मीळ आहे.

राज्यात आत्तापर्यंत अशा आठ शस्त्रक्रिया झाल्या असून सहा रुग्णांमध्ये यशस्वी झालेल्या आहेत, असे ग्लोबल रुग्णालयातील यकृत, स्वादुपिंड, आतडे प्रत्यारोपण प्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. गौरव चौबळ यांनी सांगितले. राज्यातील आठही शस्त्रक्रिया डॉ. चौबळ यांनी केल्या असून पहिली शस्त्रक्रिया २०२० मध्ये पुण्यात करण्यात आली होती.

सुपीरियर मेसेंटरिक आर्टरी थ्रोम्बोसिस म्हणजे?
आतडय़ासंबंधी धमनीमधून रक्तपुरवठा सुरळीत न होण्यामुळे आतडे

अवयव प्रत्यारोपण आणि दान याबाबत जनजागृती गरजेची
लहान आतडय़ाचे प्रत्यारोपणाचा उपाय उपलब्ध असल्याबाबत जनजागृती फारशी नसल्यामुळे या शस्त्रक्रियांसाठी किंवा अवयवाची आवश्यकता असल्याची नोंद असणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी आहे. सध्या केवळ एक रुग्ण प्रतीक्षा यादीमध्ये आहे. मृत व्यक्तीचे लहान आतडे दान करण्याबाबतही जनजागृती नसल्याने हे अवयवही प्राप्त होणे अवघड आहे. मृत व्यक्तींचे आतडे दान करताना ती व्यक्ती तरुण म्हणजे ४० वर्षांपर्यंत असणे गरजेचे असते.

पुढील खर्चाची चिंता
कोलकत्यामध्ये झालेल्या आधीच्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास आठ ते नऊ लाख रुपये खर्च झाले आहेत. या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी ही नातेवाईकांसह अनेकांनी मदत केल्याने काही जुळवाजुळव करू शकलो आहे. परंतु आजारपणामुळे अनिर्बन यांना पुन्हा काम करणे शक्य नाही. त्यामुळे पुढील खर्च कसा भागवायचा याची चिंता आता त्यांची पत्नी शर्मिष्ठा यांना सतावते आहे.

जिवंत व्यक्तीलाही दान शक्य
मूत्रिपड किंवा यकृताप्रमाणे जिवंत व्यक्तीलाही लहान आतडे दान करता येते. परंतु याबाबतही नागरिकांमध्ये फारशी जागृती नसल्याने आतडे दान करण्यास फारसे पुढाकार घेत नाहीत. शरीरामध्ये जवळपास ६०० सेंटीमीटर आतडे असते. सुमारे १०० ते १५० सेंटीमीटर आतडे शरीर कार्यक्षम राहण्यासाठी पुरसे असते. त्यामुळे एका व्यक्तीच्या शरीरातील सुमारे ४० टक्के आतडय़ाचा भाग काढून प्रत्यारोपित करणे शक्य आहे, असे डॉ. चौबळ यांनी सांगितले.

प्रत्यारोपणासाठी खर्च
लहान आतडे प्रत्यारोपणासाठी सुमारे १९ ते २० लाख रुपये खर्च आहे. शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाला आयुष्यभर काही औषधे घ्यावी लागतात. सुरुवातीच्या काही काळात हा खर्च दरमहिना सुमारे पाच ते सात हजार असून नंतर तीन ते पाच हजार असल्याची माहिती डॉ. चौबळ यांनी दिली.