प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना दोन लसमात्रांची प्रतीक्षा

दोन लसमात्रा पूर्ण झाल्या नसल्याने प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू होऊनही ऑनलाइन शिक्षणावरच समाधान मानावे लागत आहे.

या वर्षीही ऑनलाइनच शिक्षण

मुंबई : दोन लसमात्रा पूर्ण झाल्या नसल्याने प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू होऊनही ऑनलाइन शिक्षणावरच समाधान मानावे लागत आहे.

शालेय वर्गाची पायरी ओलांडून महाविद्यालयीन जीवनातील गमतीजमती अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या पदवीच्या प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. राज्य सरकारने महाविद्यालये प्रत्यक्ष भरवण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांच्या दोन लसमात्रा पूर्ण झाल्या असाव्यात अशी अट घालण्यात आली आहे. प्रथम वर्षांतील बहुतांश विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षे पूर्ण नाही. तर ज्यांची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा विद्यार्थ्यांची पहिलीच लसमात्रा घेऊन झाली आहे. परिणामी, रेल्वे प्रवासासाठीही या विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे महाविद्यालयांत येण्यास उत्सुक असूनही विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन वर्गात हजेरी लावावी लागत आहे. 

प्रथम वर्षांच्या एका वर्गात १०० विद्यार्थी शिकत असतील तर त्यापैकी २० ते ३० विद्यार्थ्यांचेच लसीकरण झालेले आहे. काही ठिकाणी पालकांचा विरोध आहे तर अनेकांची रेल्वे प्रवासाची अडचण आहे. शिवाय काही महाविद्यालयांमध्ये जागेचीही अडचण आहे. त्यामुळे प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांना या वर्षी ऑनलाइनच शिक्षण घ्यावे लागणार आहे, असे विविध महाविद्यालयांतील प्राचार्याची मते जाणून घेतल्यानंतर स्पष्ट झाले.

‘सध्या केवळ तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांना आम्ही बोलवले आहे आणि इतर वर्गातील विद्यार्थी केवळ विज्ञान प्रात्यक्षिक करण्यासाठी हजेरी लावतील. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी महाविद्यालयात एकत्र आल्याने गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही सर्वप्रथम त्यांचे व्यवस्थापन करू आणि मग प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेऊ,’ असे रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्या अनुश्री लोकुर यांनी सांगितले. 

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांना लसीकरणाचा नियम पाळून बोलवण्यात येणार आहे. मात्र कला शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागेल. वाणिज्य शाखेसाठी येत्या सोमवारपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष शिक्षण सुरू करून १५ दिवसांतील अनुभवावरून पुढील रूपरेषा ठरवू.

डॉ. दिलीप मस्के, प्राचार्य, रुपारेल महाविद्यालय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First year students two vaccines ysh

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?