मत्स्य उत्पादन कमी; जाळ्यांचेही नुकसान

शहरातील नदी, नाल्यांमधून समुद्रात वाहून येणाऱ्या कचऱ्याचा विपरीत परिणाम इथल्या जीवसंपदेवर होत असून सर्वस्वी मत्स्योत्पादनावर पोट असलेल्या मच्छीमारांची यात वाताहत होते आहे.

मुंबईचे किनारे वेगाने प्रदूषित होत आहेत. सर्व किनारपट्टीवर हजारो टन प्ल्स्टिक व अन्य कचरा पसरलेला दिसून येतो. या शिवाय वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाणी, शहरातील मोठी गटारे, नाले यातून हा कचरा थेट समुद्रात पोहचतो. या कचऱ्याचे थरच्या-थर समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात. तसेच, गेल्या काही वर्षांत समुद्रात गेलेला कचरा सागराच्या तळाशी जाऊन बसला असून पावसाळ्यात समुद्राची घुसळण झाल्याने हा कचरा पुन्हा उफाळून किनाऱ्यावर येतो आहे, असे सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितले.

याचा मोठा फटका मत्स्यव्यवसाय करणाऱ्या कोळ्यांना बसतो आहे. मासेमारीच्या वेळेस त्यांच्या जाळ्यात हा कचरा शिरतो. त्यातून जाळ्याचे नुकसान होते. यात भरती-ओहोटीचे गणित महत्त्वाचे असल्याने वेळ दवडून चालत नाही. पण, कचरा काढण्यात वेळ गेल्याने मासा हाताला कमी लागतो व जाळीही फाटल्याने फेकावी लागते, असे वरळी कोळीवाडय़ातील विलास वरळीकर यांनी सांगितले. आम्ही समुद्रात ७-८ किलोमीटर आत गेलो तरी कचराच हाती लागतो. याचा रोजच्या व्यवसायावर परिणाम झाला असून आम्ही कर्जबाजारी झालो आहोत, असे रॉयल पाटील या मच्छीमार युवकाने सांगितले.

नैवेद्याला खेकडेही कमी

काही कोळी कुटुंबांमध्ये गौरीला खेकडय़ांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळे, गणेशोत्सवात हमखास खेकडे खरेदी केले जातात. परंतु, आता हे खेकडेही मिळेनासे झाले आहेत.

‘पूर्वी आकाराने मोठे खेकडे येत असत. परंतु, खारफुटींची संख्या कमी झाल्याने आणि कचरा वाढल्याने खेकडय़ांना अंडी घालण्यासाठी जागा सापडत नाही. खेकडय़ांचा आकारही कमी होत चालला आहे,’ असे वजिरा कोळीवाडय़ातील लक्ष्मण वैती यांनी सांगितले.

मुंबईजवळच्या सागरात कोणत्याही भागात गेल्यास कचराच आढळतो. एखाद्या मच्छीमाराच्या जाळ्यात ७० टक्के कचरा लागेल आणि उरलेले मासे लागतील, अशी परिस्थिती आहे. यात प्लॅस्टिक कचऱ्याचा समावेश अधिक आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कोळंबीसारख्या माशांची अंडी अडकल्याने त्यांचे उत्पन्न घटले आहे. २००२मध्ये कोळंबीचे महाराष्ट्रात ७५ हजार टन उत्पन्न झाले होते. मात्र, यंदा हे प्रमाण थेट २५ हजार टनावर आले आहे. अशीच परिस्थिती बोंबील, बांगडा, सुरमई या माशांची आहे. बांगडय़ाचे उत्पन्न २०११ मध्ये ९० हजार टन होते, ते दोन वर्षांत १८ हजार टनांपर्यंत घटले आहे.

– डॉ. विनय देशमुख, सागरी वैज्ञानिक